पुन्हा एकदा अत्रे, पु. ल., कुसुमाग्रज …

आचार्य अत्रे, पु ल देशपांडे व कुसुमाग्रज म्हणजे गेल्या ६० वर्षाहूनही अधिक काळ मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे तीन जबरदस्त प्रतिभावंत. महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक इतिहासाला ज्यांच्याशिवाय पूर्णताच येणार नाही असे तीन थोर सरस्वतीपुत्र. ज्यांच्या साहित्याची मोहिनी, ज्यांचे गारुड आजही मराठी मनावर कायम आहे आणि कितीही वाचले तरीही ज्यांच्या साहित्याची गोडी कायमच अवीट राहिली आहे, असे हे थोर कलोपासक, रसिकाग्रणी. या तिघांपैकी आज कोणीही हयात नाही. मात्र अर्धशतकाहूनही अधिक काळ त्यांच्या साहित्याची मोहिनी महाराष्ट्रमनावर कायम आहे.या तिघांबद्दल परचुरे प्रकाशन मंदिराने नुकतीच तीन छान पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘अप्रकाशित आचार्य अत्रे’, ‘पुन्हा मी, पुन्हा मी’ व ‘सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज’ ही ती तीन पुस्तके. यापैकी अप्रकाशित आचार्य अत्रे  हा अत्रेंच्या आजवर अप्रकाशित राहिलेल्या साहित्याचा संग्रह आहे. तसेच पुन्हा मी, पुन्हा मी हा पुलंच्या अप्रकाशित साहित्याचा संग्रह आहे तर सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज हा विविध मान्यवर साहित्यिक व समीक्षकानी कुसुमाग्रजांच्या हयातीत तसेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे.

पुलंना जाऊन त्यामानाने फार काळ लोटलेला नाही. त्यामुळे त्यांचे बरेच अप्रकाशित साहित्य प्रकाशित होत आहे. कदाचित आणखीही होईल. पुन्हा मी, पुन्हा मी या संग्रहापूर्वीही परचुरे प्रकाशन मंदिराने ‘गाठोडे’ व ‘पाचामुखी’ ही पुलंच्या अप्रकाशित साहित्याची दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत व ती सहज उपलब्ध आहेत. पुन्हा मी, पुन्हा मी हे या मालिकेतले तिसरे पुस्तक म्हणता येईल. २७ फेब्रुवारी २०१५ ला हे पुस्तक प्रकाशित झाले. मुखपृष्ठ व आतील व्यंगचित्रे अनेक वर्षांपासून पुलंची पुस्तके सजविणारे सिद्धहस्त व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची आहेत. त्यामुळे पुस्तक जणू पुलंच्या हयातीतच प्रकाशित झाले असावे असे वाटते. मात्र या संग्रहातील ‘एक हरपलेले प्रेय’ या कवितेतील रेखाटने ही श्रीराम बोकील यांची आहेत. या संग्रहात आजवर अप्रकाशित राहिलेले पुलंचे विनोदी व वैचारिक लेख, (विनोदी) कथा व कविता, व्यक्तीचित्रणे, प्रासंगिक लिखाण, तसेच काही भाषणे, मुलाखती व क्वचित एखादे पत्रही आहे. यातील काही साहित्य हे पुलंनी आपल्या उमेदवारीच्या काळात, म्हणजे १९४५-६० च्या दरम्यान लिहिलेले आहे. ‘सत्यकथा’, ‘साधना’, ‘अभिरुची’ यांसारख्या दर्जेदार व त्याकाळी लोकप्रिय असलेल्या नियतकालिकांमधून या लिखाणाला पूर्वप्रसिद्धी लाभलेली आहे. या संग्रहातील पुलंचे परमस्नेही श्री वसंत सबनीस यांनी घेतलेली पुलंची खुमासदार मुलाखत (सबनीस पुसे, देशपांडे सांगे) व श्री अरविंद औंधे यांनी घेतलेली काहीशी सिरीयस मुलाखत (माझ्या आयुष्यात फ्लूक्स वारंवार आले) या दोन्ही मुलाखतींतून पुलंचा हजरजबाबीपणा तसेच एक कलाकार व रसिक म्हणून त्यांचे स्वतःबद्दलचे स्वतःच्या साहित्यनिर्मितीबद्दलचे व एकूणच कलेबद्दलचे अत्यंत सुंदर व मूलगामी चिंतन आपल्याला दिसून येते. व्यक्तीचित्रणे लिहिण्यात पुलंचा हातखंडा. याही पुस्तकात पुलंनी त्यांना गुरुस्थानी असलेल्या मो. ग. रांगणेकरांचे सुंदर व्यक्तिचित्र रेखाटले आहे. दुसरे व्यक्तिचित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे आहे. बाबासाहेबांचे ‘गणगोत’ मध्ये पुलंनी लिहिलेले व्यक्तिचित्र तर सुप्रसिद्ध आहेच पण प्रस्तुत संग्रहातील “शिवरंगी रंगलेले बाबासाहेब पुरंदरे” हे तरुण भारत च्या बाबासाहेब पुरंदरे गौरव विशेषांकासाठी लिहिलेले व्यक्तिचित्रही अत्यंत वाचनीय झाले आहे. गणगोत वाचलेल्यांनासुद्धा अनेक वर्षानी लिहिलेले हे व्यक्तिचित्र तितकेच ताजे व वाचनीय वाटेल. विविध प्रसंगी पुलंनी केलेली तीन भाषणेही या संग्रहात आहेत. त्यातील ‘चंदनाचे हात, पायही चंदन’ हे साने गुरुजींवर केलेले भाषण गहिवर आणणारे आहे. गुरुजींच्या महत्तेचे अचूक शब्दांत व अत्यंत आत्मीयतेने केलेले हे वर्णन आहे. एकंदरीतच पुलंच्या अप्रकाशित साहित्याचे हे संकलन म्हणजे कथा, कविता, विनोदी लेख, व्यक्तिचित्रण, नाटिका, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत पु. ल. नावाच्या बहुरूपी खेळीयाने केलेल्या मनस्वी मुशाफिरीचे दर्शन घडवते. पु. लं. म्हणजे निखळ, निर्भेळ आणि अभिरुचीसंपन्न जीवनानंद, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना सदोदित येतो आणि का कोण जाणे, पण पुलंचे आणखी अप्रकाशित वाङमय लवकर प्रसिद्ध व्हावे अशी ओढ वाटते. लहान मूल जसे आपले चॉकलेट पुरवून पुरवून खाते तसेच हे पुस्तकही आपण पुरवून पुरवून वाचावे- नव्हे पुलंचा प्रसन्न सहवास संपूच नये असे वाटत राहते.

आचार्य अत्रेंच्या अप्रकाशित साहित्याचे संकलन असलेले ‘अप्रकाशित आचार्य अत्रे’ हे पुस्तक म्हणजे साहित्यरसिकांना मेजवानीच ठरावी. माझ्या अंदाजाप्रमाणे आचार्य अत्र्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेले त्यांचे एकमेव पुस्तक म्हणजे परचुरे यांनी प्रकाशित केलेला ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा आचार्य अत्र्यांच्या अग्रलेखांचा संग्रह. त्यानंतर दुसरे ‘अप्रकाशित आचार्य अत्रे’ हेच पुस्तक असावे. आचार्य अत्रे हे बहुरंगी, बहुढंगी, बहुश्रुत व चतुरस्त्र प्रतिभा असलेले व्यक्तिमत्व. त्यांचा राग व लोभ दोन्ही दांडगा. एखाद्यावर प्रेम करायचे तर अगदी त्याचा जीव गुदमरून जाईपर्यंत आणि एखाद्याला ठोकून काढायचे (शब्दांनी… खरोखर नव्हे), तर तेही त्याने त्राहिमाम म्हणेपर्यंत असा अत्रे बाणा. अत्र्यांनी कवी व नाटककार म्हणून आपल्या साहित्यिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची नाटके प्रचंड गाजली. तसेच त्यांच्या झेंडूच्या फुलांनीही महाराष्ट्राला वेड लावले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली त्यांची कामगिरी तर बेजोडच आहे. ‘मी कसा झालो?’ व ‘क-हेचे पाणी’ हे त्यांचे आत्मचरित्र अजून लोकप्रिय आहे.त्यामुळे अत्र्यांचे लिखाण म्हटले की मराठी माणसाची उत्कंठा चाळविली जातेच. याच उत्कंठेपोटी आपण ‘अप्रकाशित आचार्य अत्रे’ हे पुस्तक हाती घेतो आणि आपली निराशा मुळीच होत नाही. या पुस्तकात विविध प्रसंगी अत्र्यांनी विविध वर्तमानपत्रे व नियतकालीकांतून केलेल्या प्रासंगिक लिखाणाचा तसेच त्यांच्या बालपणीच्या व उमेदवारीच्या काळातील आठवणींचा भरणा मुख्यत्वेकरून आढळतो. ‘क-हेचे पाणी’ व ‘मी कसा झालो ?’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकांत येऊ न शकलेले अथवा संक्षेपाने आलेले काही किस्से व आठवणी या पुस्तकात मूळ स्वरूपात व सविस्तर येतात. यांपैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे अत्र्यांनी रेखाटलेले त्यांच्या आईचे व्यक्तिचित्र. ‘क-हेचे पाणी’ च्या पहिल्या खंडात अत्र्यांनी आपल्या आईबद्दल व एकूणच कुटुंबाबद्दल लिहीले आहे. पण येथे आचार्यांनी आपल्या आईचे व्यक्तिचित्र विस्तारपूर्वक रेखाटले आहे. या संग्रहातील सर्वात प्रदीर्घ लेख म्हणजे अत्र्यांच्या लंडनपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन असलेला ‘माझा विलायतचा प्रवास’ हा होय. ‘क-हेचे पाणी’ मध्ये संक्षेपाने आलेले हे वर्णन येथे विस्ताराने मूळ स्वरूपात वाचायला मिळते. या सर्व लेखांशिवाय मराठी भाषा, मराठी विनोद, विडंबनकाव्य अशा विविध साहित्यिक विषयांवर विविध प्रसंगी अत्रेंनी केलेले लेखन या संग्रहात आहे. त्याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांची सुंदर व्यक्तिचित्रेही आहेत. रंगो बापूजी गुप्ते व त्यांचे १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यावर ‘सत्तावनी स्वातंत्र्ययुद्धाचे सूत्रधार’ हाही अत्यंत वाचनीय लेख आहे. गुणपूजक व रसिक आचार्य अत्रे आपल्याला या पुस्तकातून भेटतात.

‘सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज’ हे याच मालिकेतील तिसरे पुस्तक. कुसुमाग्रजांच्या हयातीत तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी लिहीलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. या संग्रहाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात कुसुमाग्रजांच्या हयातीत त्यांच्याबद्दल विविध मान्यवरांनी लिहीलेले लेख आहेत तर दुस-या भागात त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर लिहिलेले लेख आहेत. शांत, सात्विक, तपस्वी वृत्तीच्या पण अत्यंत रसिक अशा या सौंदर्योपासक कवीच्या संपन्न व्यक्तिमत्वाचा वेध हे पुस्तक घेते. या संग्रहात अच्युतराव व वसंत शिरवाडकर आणि कुसुमताई सुनावणी ही घरची मंडळी तर आहेतच, पण अगदी वि.स. खांडेकरांसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठांपासून ते वसंत कानेटकर, शांताबाई शेळके अशा समकालीनांचा व ना. धों. महानोर व नारायण सुर्व्यांसारख्या तात्यासाहेबांना बरेच जूनियर असणा-या साहित्यिकांचाही समावेश आहे.

कुसुमाग्रजांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या संघर्षापासून ते त्यांनी विविध व्यक्ती, संस्था व नाशिकसारखे शहर यांच्यावर केलेल्या निर्व्याज प्रेमाची साक्ष हे लेख पटवून देतात. महाराष्ट्रशारदेच्या गळ्यातील ताईत असलेला हा कविश्रेष्ठ रंजल्यागांजल्यांसाठी कुठलाही गाजावाजा न करता झिजणारा एक उमदा माणूस कसा होता आणि अनेकांच्या पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणून त्यांना प्रेरणा देणारा दीपस्तंभही कसा होता याचे मनोज्ञ दर्शन हे पुस्तक वाचताना घडते. आजपर्यंत मराठी रसिकांना कुसुमाग्रजांचे चरित्र ‘तो प्रवास सुंदर होता’ व ‘कहाणी कुसुमाग्रजांची’ या दोन चरित्रग्रंथांतूनच मुख्यतः वाचायला मिळाले. पण इतक्या विविध क्षेत्रात पसरलेल्या कुसुमाग्रजभक्तांचे लेख एकाच ठिकाणी वाचायला मिळणे व त्यातून या कविश्रेष्ठाच्या व्यक्तित्वाचे विविधांगी दर्शन घडणे हे या लेखसंग्रहाचे एक फार मोठे यश म्हणावे लागेल.

या तिन्ही पुस्तकांचे संकलन डॉ. नागेश कांबळे यांनी केले आहे. कुसुमाग्रजांवरील पुस्तकाचे संकलन नागेश कांबळे यांच्यासह भाऊ मराठे यांनीही केले आहे.

तिन्ही पुस्तके सुंदर व वाचनीय झाली आहेत व मराठी साहित्यातील अत्यंत महत्वपूर्ण पुस्तके अशीच त्यांची नोंद करावी लागेल.

Leave a comment