धन्य ते गायनी कळा… धन्य गानकोकिळा !

“If man’s fate is to suffer in an unfriendly universe, Beethoven’s music creates the spirit to endure and even to exult in the endurance.”

फार पूर्वी एका पुस्तकात संगीतकार बीथोवेनवरच्या एका चरित्रात्मक लेखातल्या या ओळी आज लतादीदींच्या महाप्रयाणाच्या निमित्ताने खूप प्रकर्षाने आठवल्या. सोसणं हेच जर माणसाचं प्राक्तन असेल तर बीथोवेनचं संगीत ते  सोसणं सुसह्य करतं, एवढंच नव्हे तर त्या सोसण्यातही आनंद निर्माण करतं. या बीथोवेनबाबतच्या ओळी लतादीदींच्या बाबतीतही अगदी सार्थ ठरतात. कोट्यावधी मनुष्यांची आयुष्यं फुलविणारा, कोट्यावधींचे जगणे सुसह्य करणारा, दैवी स्वर ज्या शरीरातून प्रकटायचा, ते शरीर निसर्गनियमानुसार आज पंचतत्वात विलीन झाले. दीनानाथ मंगेशकर नावाच्या या लोकोत्तर कलाकाराची ही कन्या आपल्या पित्याच्या कीर्तीलाही झाकोळत स्थिरचर व्यापून दशांगुळे उरली. ती जगापुढे आली  तेच मुळी शूरा मी वंदिले गात. कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरच्या रंगमंचावर परकर-पोलक्यातली चारचौघा मुलींसारखी दिसणारी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ही कन्या फार तर एखादे बडबडगीत गाऊन कौतुकाची टाळी घेईल अशी अपेक्षा करणारा श्रोतृवृंद विजेच्या लखलखाटासारखा शूरा मी वंदिले म्हणत समेचा भेद करणारा स्वर ऐकून जो एकदा स्तिमित झाला तो पुढे चार पिढ्या तसाच स्तिमित होत राहिला. जन्मतःच रवीबिंब गिळायला झेपावणाऱ्या हनुमंतासारखीच ही झेप होती. ही देवाघरची देणी असतात. त्याला लौकिक मोजमापाच्या फूटपट्ट्या चालतच नाहीत. दिपून जाणे एवढेच तिथे आपल्या हाती असते. हृष्यामि च पुनःपुनः असे म्हणणार्‍या संजयासारखे आपण पुन्हा पुन्हा हर्षभरित होत राहतो.

पण याचा अर्थ लतादीदींचे मोठेपण पण केवळ जन्मजात किंवा देवदत्त होते असा नाही. ते विक्रमार्जित सत्व होते. ती स्वयमेव मृगेंद्रता होती. तपश्‍चर्येशिवाय मोठेपण मिळत नसते. महाभारतात- मोठेपण कशाने मिळते? या यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना युधिष्ठिर म्हणतो- तपसेन महता पदम्– म्हणजे तपश्चर्येने मोठेपण मिळते. लता मंगेशकरांना मोठेपण सहज मिळाले नाही. कष्टाचे डोंगर उपसत, व्रतस्थ जीवन जगत आणि स्वार्थ बाजूला ठेवून जे खडतर आयुष्य त्या जगल्या त्याची कल्पना फार फार थोड्या लोकांना असेल. आठ दशके, छत्तीस भाषांमधून विविध प्रकारची हजारो गाणी गायची- आणि ती सुद्धा दर्जाशी कुठलीही तडजोड न करता- हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. ज्या भाषेत गायचे, त्या भाषेच्या शब्दांचे उच्चार अचूक व सफाईदार आलेच पाहिजेत असा कटाक्ष ठेवून लतादीदी गायिल्या. म्हणून हिंदी-मराठी श्रोत्यांना त्या जितक्या आपल्या वाटतात, तितक्याच सिंहली किंवा तमिळ श्रोत्यांनाही आपल्याच वाटतात. हिंदी सिनेमासाठी गायचे तर उर्दू उच्चार अचूक हवेत म्हणून संगीतकार नौशाद यांच्या आग्रहाखातर त्या उर्दू शिकल्या. मुगले-आजम सारख्या अभिजात चित्रपटाची गाणी इतक्या अचूक उर्दू उच्चारांसह गाणारी ही गायिका मराठी भाषिक आहे हे अनोळखी माणसाला सांगूनही खरे वाटणार नाही.

एका इंग्रज प्राध्यापकाने एका जपानी विद्यार्थ्याला एकदा विचारले- “बाळा तुला शेक्सपियर का आवडतो?” त्यावर तो जपानी विद्यार्थी म्हणाला- “त्याची सर्व पात्रे जपानी असतात म्हणून !” कलाकार देश, भाषा, काळ यांची बंधने ओलांडतो तो असा. अखिल मानवजातीची सुखदुःखे आपल्या नाटकातून  चितारणारा शेक्सपिअर काय किंवा अखिल मानवजातीला आपल्या सुरांनी गहिवर आणणाऱ्या लतादीदी काय यांची जातकुळी एकच. यात डावं-उजवं कसं ठरवणार? आपलं-परकं कसं ठरवणार? मानवाचे अंती एक गोत्र- हेच खरे ! कलेसाठी कला की जीवनासाठी कला याचा खल ज्यांना करायचा त्यांनी खुशाल करावा. पण जगणं सुसह्य करेल, लौकिकातून वर उठवून क्षणभर का होईना, पण परतत्त्वाचा स्पर्श करवेल, ती खरी कला. बाकी केवळ कसबी कारागीरी! असंख्य गायक-गायिका यापूर्वी झालेत, यानंतरही होतील- पण ज्यांच्या सुराला परतत्त्वाचा स्पर्श लाभला ते लतादिदींसारखे कलावंत फार फार क्वचित निर्माण होतील.

सिनेमा शिवायही असंख्य प्रसंग लतादीदींच्या स्वरांनी अजरामर केले. ‘शिवकल्याण राजा’ हा अल्बम कोण विसरू शकेल? शिवरायांचा जयजयकार करायला त्याच  तोलाचे प्रतिभावंत हवेत. ते तसे एकाच काळात निर्माण होणे आणि एकत्र येणे हा देव दुर्लभ योग. पण तो आला आणि त्यातून निर्माण झालेला शिवकल्याण राजा हा संगीत अल्बम महाराष्ट्रसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी अमूल्य ठेवा ठरला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

कवी भूषण, राम गणेश गडकरी, वीर सावरकर, कुसुमाग्रज यांच्यासारखे महाकवी, संगीत द्यायला पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, निवेदन साक्षात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आणि स्वर लतादीदींचा. यातून निर्माण झाले ते अजिंठा-वेरूळच्या तोडीचे स्वरशिल्प ! शिवकल्याण राजा मधले- ‘हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा’ हे शब्द एका श्वासात गाऊन ‘तेजा’ मधल्या ‘जा’ वर अत्यंत लीलया व सफाईदार अशी हरकत घ्यायला काय लागते हे- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ! याच अल्बम मधला ‘गुणि बाळ असा, जागसि का रे वाया…’ हा राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला शिवबाचा पाळणा, ‘हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ गाणाऱ्या लतादीदींनीच गायला आहे हे कोणाला खरे वाटेल? कुंद कहां, पयवृंद कहां  हे भूषण चे पद किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही कुसुमाग्रजांची अजरामर कविता यांना अमर करणे इतर कोणाला शक्य होते? ‘सरणार कधी रण’ ऐकतांना मूर्तिमंत बाजी प्रभू उभे करणे इतर कोणाला शक्य होते? ‘मोगरा फुलला’ हे शब्द लिहिताना ज्या ऊर्मी ज्ञानोबांच्या मनी दाटल्या असतील त्याच ऊर्मी ते शब्द लतादीदींच्या मुखातून बाहेर पडताना आपल्या अंतरी दाटतात. म्हणून त्या शब्दांचे ‘सूर’ झाले. ते शब्द न राहता ‘अक्षर’ ठरले. ‘तुम आशा विश्वास हमारे’ असे श्रीरामाला आळवताना अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत ते लतादीदींच्या सुरांनीच! ‘आकाश के उस पार भी आकाश है’ हे अशियाई स्पर्धेसाठी लतादीदींनी गायलेले गीत आजही लाखो निराश तरुण तरुणींना प्रेरणा देते. ‘गगन सदन तेजोमय’ मधल्या ‘ते’ वरची मनाचा ठाव घेणारी हरकत ऐकून  ज्या तेजोमय भास्कराला ते गीत आळवते आहे, तोही क्षणभर आपला रथ थांबवून दाद दिल्याशिवाय राहिला नसेल. ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ हे ज्ञानेश्वरांचे बोल लतादीदींच्या तोंडून येतात तेव्हा पळभर का होईना कोणाचे अवगुण  सांडीत नाहीत?

फ्रेंच राज्यक्रांती च्या दिवसांत आपण जन्मलो हे आपलं भाग्य होतं, पण त्यावेळी आपण तरुण होतो हे त्याहून मोठं भाग्य होतं- असं वर्डस्वर्थ म्हणाला होता. अगदी त्याच धर्तीवर लतादीदी गात असताना आपण त्यांना पाहू-ऐकू शकलो हे आपलं भाग्य आणि त्यांच्या गीतांना ऐकून आपलं तारुण्य मोहरलं हे त्याहून मोठं भाग्य असंच गेल्या पाऊण  शतकात जन्मलेल्या सर्वांना वाटत असेल. Song has the longest life असं कुण्या कवीने म्हटलं आहे. लतादीदी गात-गात स्वतःच गाणं होऊन गेल्या. म्हणूनच त्यांची गाणी आणि त्या स्वतःही चिरंजीव झाले आहेत. ‘धन्य ते गायनी कळा’ म्हणणारे समर्थ आज असते तर त्यापुढे- ‘धन्य गानकोकिळा’ असेही म्हटल्याशिवाय राहिले नसते.

धर्माने मला काय दिले?

आज साधना साप्ताहिकाचा अंक हाती आला. या अंकात धर्माने मला काय दिले? या विषयावर काही मान्यवर विचारवंतांची चर्चा साधनाने घडवून आणली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी जोपासलेल्या उद्दिष्टांपैकी कालसुसंगत धर्मचिकित्सा हेही एक उद्दिष्ट होते. त्याला अनुसरूनच साधनाने या अंकाची ही बीजकल्पना ठेवली आहे. ही थीम मला भावली. प्रश्न आवडला. खरंच धर्माने मला काय दिले? मलाही या विषयावर प्रकट चिंतन करावेसे वाटले. म्हणून ही लेखनकामाठी.

मी हिंदू. हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलो म्हणून हिंदू. अगदीच सनातनी नव्हे, पण समृद्ध आणि पापभीरु अशा एका मोठ्या संयुक्त हिंदू कुटुंबात जन्मलो. कोणाचेही वाईट चिंतू नये, करू नये, निर्व्यसनी रहावे, उत्तम चारित्र्य जोपासावे, मन लावून शिकावे आणि इभ्रतीला सदैव जपून असावे हे संस्कार लहानपणापासून मनावर झाले. परमेश्वर आहे. पापाला शिक्षा असते. पुण्याला मान असतो. पुण्याचे, सत्कर्माचे चांगले फळ मिळते, हे मनावर ठसले. घरात व्रतवैकल्ये, सणवार नियमित साजरे होत. माझी आत्या घरात सर्वात जेष्ठ. भावंडांना शिकता यावे, मोठे होता यावे, म्हणून ती आजन्म अविवाहित राहिली व कुटुंबाला तिनेच ऊर्जितावस्थेत आणले. दररोज सकाळी पाच वाजता सडा-संमार्जन, देवपूजा आज ऐंशीव्या वर्षी सुद्धा ती नियमित करते. गौरी, गणपती, चैत्र व आश्विनातले नवरात्र इत्यादी सर्व सण यथासांग साजरे होतात ते आत्याच्याच पुढाकाराने व परिश्रमांनी. माझा जन्म व्हायचा होता, तेव्हा होणाऱ्या बाळावर (म्हणजे अस्मादिकांवर) चांगले संस्कार व्हावेत म्हणून श्रावणात रामविजयाची पोथी लावण्याचा क्रम सुरू झाला व तो पुढे दहा-अकरा वर्षे सुरू राहिला. वडील व तिन्ही काकांसहित सर्वजण धार्मिक. सूर्याला अर्घ्य व तुळशीला तांब्याभर पाणी अर्पण करण्याचा क्रम या सर्वांनी आयुष्यभर पाळला. या वातावरणामुळे धर्मावर श्रद्धा बसली व मी ही धार्मिक झालो. रामायण, महाभारत, श्रीमद् भागवत, हरिविजय हे ग्रंथ ऐकले, वाचले. एका थोर व उदात्त मूल्यपरंपरेचे आपण पाईक आहोत हे त्यातून जाणवले. ‘परोपकार पुण्याय, पापाय परपीडनम्’(परोपकार हे पुण्य तर परपीडा म्हणजे पाप), हे धर्माचे सार आहे याची खात्री पटली. मर्यादशील असण्यात जीवनाचे सार्थक आहे. काही झाले तरी सर्व बाबतीत मर्यादा पाळावी हे रामायणाने शिकवले. ‘न भीतो मरणादस्मि, केवलं दूषितो यशः’ (मी मृत्यूला नव्हे, तर केवळ अपकीर्तीला भितो)  असे म्हणणारा राम, ‘नहीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण’ (अधर्माने मिळत असेल तर मला इंद्रपदही नको) असे म्हणणारा राम, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ (माता आणि मातृभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत) असे म्हणणारा राम व या सर्व उक्ती आचरणात आणणारा राम धर्मग्रंथातच भेटला. स्वाभिमान, शील, कर्तव्यपरायणता, निस्वार्थ सेवा, वचनाचे पालन- ही मूल्ये धर्मानेच दिली. कालौघात दोन मोठे आघात परिवारावर झाले. व्यावहारिक संकटे तर आणिक आली. पण कोणीतरी लाज राखणारा आहे, ही अनुभूतीही आली- नव्हे, येत असते.

अजूनही धर्म कळला असे म्हणण्याचे धाडस होत नाही. पण धर्माला धरून राहावे, ‘न त्यजेत् धर्मं जीवितस्यापि हेतोः’ (अगदी जीवितासाठी सुद्धा धर्माचा त्याग करू नये) असे सतत वाटते. सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहेत. सर्वांचे कल्याण चिंतावे व सर्वांच्या कल्याणासाठी धर्म आचरावा हे धर्मानेच शिकविले आणि म्हणूनच दोन्ही हात वर करून सांगणाऱ्या व्यासांप्रमाणे- धर्मादर्थश्च कामश्च, स किमर्थम् न सेव्यते? (धर्मामुळे अर्थ आणि काम (हे पुरुषार्थ) आहेत, मग धर्माचे पालन का करत नाही?) हा साधा प्रश्न सदैव पडत राहतो. उत्तर काही मिळत नाही.

‘हिंदू’ ची दशकपूर्ती …

hindu_novel‘हिंदू’ ही नेमाड्यांची magnum opus आहे, हे निश्चित. ‘कोसला’ पासून चालत आलेला त्यांच्या लेखनाचा प्रवाह ‘हिंदू’ मध्ये विशाल रूप धारण करतो. या कादंबरीच्या प्रकाशनाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ ने नुकतीच एक चर्चा घडवून आणली. त्यात अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली.

मुळात नेमाड्यांच्या या कादंबरीकडून वाचकांच्या अपेक्षाच फार होत्या / आहेत असे आजही या चर्चेतून स्पष्ट होते. हेच या कादंबरीचे यश म्हणता येईल. ‘हिंदू’ हा शब्दच मुळात भारतीयांसाठी आणि भारताच्या अभ्यासकांसाठी अत्यंत संवेदनशील. त्यात या कादंबरीचे शीर्षक अत्यंत तिरपागडे- ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’.  आता या शीर्षकातला ‘हिंदू’  शब्द नेमके काय सुचवतो ? हिंदू धर्म ? की हिंदू संस्कृती ? हिंदू समाज की हिंदुत्व ही राजकीय विचारधारा ? की एकंदरीत सर्वच ? यापैकी नेमके कशाला ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हटले आहे ?

मला वाटते या शीर्षकातील ‘हिंदू’ या शब्दावरून नेमाड्यांना ‘हिंदू’ ही  आयडेंटिटी, ही ओळख, अपेक्षित आहे. ही ओळख एका विशिष्ट सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेतून तयार होते. नेमाडे तिलाच ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हणतात. Continue reading

हजरजबाबी चर्चिल

विन्स्टन चर्चिल यांच्या हजरजबाबीपणाचे, वाक्चातुर्याचे  व इंग्रजी भाषेवील त्यांच्या प्रभुत्वाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सैनिक, राजकारणी, युद्धनेता, मुत्सद्दी, वक्ता, लेखक, इतिहासकार, चित्रकार– एकाच आयुष्यात अशा अनेक भूमिकांमधून वावरलेला हा महापुरुष. साहित्याचे नोबेल मिळविणारा एकमात्र राजकारणी. व्यक्ती कमी व वल्ली अधिक.
गेली शंभर-सव्वाशे वर्षे चर्चिलबद्दल बोलल्या व लिहिल्या जात आहे. ते हयात असतानापासून ते आज त्यांच्या निधनाला पन्नासहून अधिक वर्षे उलटली तरीही हा ओघ चालूच आहे. चर्चिल हे जीवनात अनेक अंगांनी रस घेणारे रसिक होते. आपल्या वाणी व लेखणीने त्यांनी जवळपास सत्तर वर्षे जगाला भुरळ घातली – ब्रिटनला दुसरे महायुद्ध जिंकून दिले. ही भुरळ एकविसाव्या शतकातही कायम आहे. याची साक्ष म्हणजे ‘विकेड विट ऑफ विन्स्टन चर्चिल’ हे अत्यंत खुमासदार पुस्तक. डोमिनिक एनराइट यांनी या पुस्तकाचे संकलन-संपादन केले आहे. हे पुस्तक २००१ मध्ये प्रकाशित झाले. म्हणजे ते फार जुने नाही. चर्चिल यांच्या मजेदार कोट्या, त्यांचे शब्दचातुर्य, त्यांची तरल विनोदबुद्धी,  त्यांचा हजरजबाबीपणा व आपल्या वाक्चातुर्याने प्रतिपक्षाचे दात त्यांच्याच घशात घालण्याची त्यांची खुबी या सर्व गुणांचे अत्यंत मजेदार व विलोभनीय दर्शन हे पुस्तक वाचताना घडते. या सर्व मजेदार किश्शांचे संकलन श्री एनराइट यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केले आहे. या पुस्तकातील अनेक प्रसंग हे चर्चिल यांच्या विविध प्रसंगी केलेल्या भाषणांतून, वक्तव्यांतून व लिखाणातून सर्वज्ञात होतेच. पण इतर अनेक प्रसंग संपादकाने मोठ्या कष्टाने चर्चिल यांचे कुटुंबीय, मित्र, सहकारी, समकालीन राजकारणी, सेनाधिकारी, पत्रकार इत्यादींच्या लिखाणातून वा प्रत्यक्ष मुलाखतीतून संकलित केले आहेत. क्वचित काही ठिकाणी एकाच प्रसंगाची वेगवेगळी आवृत्ती आपल्याला आढळते, तर कधी इतर कोणाच्या तोंडचे वाक्य उत्साही चाहत्यांनी चर्चिलच्या तोंडी घातलेले आढळते, पण असे असले तरीही हे सर्व किस्से दंतकथा अर्थातच नाहीत. Continue reading