वाचनाचा आवाका जसाजसा वाढतो, तसातसा अनेक पुस्तकांसोबत परिचय होतो. काहींशी गाढ मैत्री होते, काही जुन्या नव्या पुस्तकांबद्दल माहिती मिळत जाते आणि वाचनानंद वर्धिष्णू होत जातो.
काही जुन्या पुस्तकांबद्दल माहिती मिळते, त्यांना वाचायची इच्छासुद्धा होते, पण अनेकदा ती पुस्तके दुर्मिळ झालेली असतात किंवा अनुपलब्ध असतात. अशा वेळी त्यांच्याबद्दल वाटणारी ओढ अधिकच वाढते. त्यांना काहीही करून मिळवायची इच्छा होते. मग मी वळतो इंटरनेट कडे. अनेकदा अशी पुस्तके कुठल्यातरी ऑनलाइन अभिलेखागारात अथवा गूगल बुक्स सारख्या संकेत स्थळावर ई-बुकच्या स्वरुपात आढळतात. कधीकधी जुनी पुस्तके विकणाऱ्या ऑनलाइन बुकस्टोअर मध्ये सापडतात तर कधी कुठल्या तरी ग्रंथालयात किंवा जुनी पुस्तके विकणारांकडे सापडतात. मात्र अनेकदा कुठेच सापडत नाहीत. हवे असलेले दुर्मिळ पुस्तक सापडल्यावर होणारा आनंद वेगळाच. मात्र अशा वेळी या पुस्तकाची आवृत्ती आज प्रकाशनात हवी होती असे वाटल्यावाचून राहत नाही.
आज मी अशाच काही मराठी व इंग्रजी पुस्तकांबद्दल लिहीणार आहे, जी आज फक्त ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत किंवा मुळीच उपलब्ध नाहीत, पण ज्ञानाच्या क्षेत्रात ज्यांचे मोल आहे आणि त्यांची आवृत्ती प्रकाशनात असणे माझ्या व माझ्यानंतरच्या पिढयांसाठी उपकारक आहे.
मी आयुष्यात वाचलेले पहिले गंभीर (व मोठे) पुस्तक म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित कथनमाला. पाचव्या वर्गाची परीक्षा पास झाल्यानंतर बाबांचे कपाट धुंडाळतांना हे पुस्तक अवचित हाती लागले अन मग त्याने मनाचा ताबा कधी घेतला हे काही कळलेच नाही. पत्रकार गजानन खोले यांनी संकलित केलेले बाबासाहेबांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानांचे हे पुस्तक पुण्याच्या इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. पुढे राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांनी लिहिलेले चरित्र वाचण्याचाही योग आला. पण कथनमालेत त्यामानाने अधिक तपशील होते व ते अधिक रंजकही होते. मला आठवते, कवी भूषणाचे पूर्वायुष्य, त्याचा त्याच्या वहिनीशी स्वयंपाकातील मिठावरून झालेला वाद व पुढे भूषणाच्या प्रसिद्धी मिळविण्याची कथा- या सगळ्या व अशांसारख्या अनेक रंजक तपशीलांनी शिवचरित कथनमाला भरलेली आहे. आज हे पुस्तक माझ्याजवळ नाही. खूप धुंडाळले. इंटरनेट वर शोधले. प्रकाशकांकडेही चौकशी केली, पण गेली अनेक वर्षे हे पुस्तक आवृत्तीत नसल्यांचे कळते. आता काही ग्रंथालयात त्याचा जुन्या प्रती शिल्लक आहेत, तेवढ्याच.
हे पुस्तक प्रकाशनात असावे असे प्रकर्षाने वाटते. यावर वाचकांच्या उड्या पडतील हे मात्र निश्चित. इंद्रायणी साहित्त्य प्रकाशनानेच हे कार्य शक्य तितक्या लवकर करावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.
१८५७ ची शिपाई गर्दी हे आज प्रा. नरहर रघुनाथ फाटक यांचे पुस्तकही अत्यंत दुर्मिळ झालेल्या पुस्तकांच्या श्रेणीत येते. १९५७ साली १८५७ च्या उठावाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची वेगळी मीमांसा करणारे प्रा. फाटकांचे हे पुस्तक आहे. १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यसमर नसून केवळ शिपाईगर्दी होती असे या पुस्तकातील फाटकांचे मत अत्यंत वादग्रस्त ठरले. कठोर वैचारिक शिस्तीचा, भरपूर पुराव्यांनिशी विषयांची मांडणी करणारा नामूलं लिख्यते किंचित हे व्रत कसोशीने पाळणारा अभ्यासक म्हणून प्रा. फाटक प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या पुस्तकाने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली. आचार्य अत्र्यांनी तर फाटकांविरुद्ध आघाडीच उघडली. चित्रशाळा प्रेसने १९५७ साली प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची प्रत मलातरी आज कुठेही आढळली नाही. ई-बुक स्वरुपात तर राहोच पण मी DELNET, Digital Library of India अशा ग्रंथालयाच्या जालांमध्येही शोध घेतला. पण कुठल्या ग्रंथालयामध्येही हे पुस्तक आढळले नाही.
मला या पुस्तकाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. फाटकांनी आपल्या मताच्या समर्थनार्थ काय पुरावे दिले असतील व कसा युक्तिवाद केला असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. २००७ साली १८५७ च्या उठावाला दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी सुद्धा या पुस्तकाची आवृत्ती निघाली नाही. आतातरी कुठल्यातरी प्रकाशकाने या पुस्तकाची आवृत्ती काढून एक महत्वपूर्ण पुस्तक विस्मृतीत जाण्यापासून वाचवावे. फटकांशी स्नेहबंध असलेले मुंबई मराठी साहित्य संघ हे करेल काय ?
सेतुमाधवराव पगडी यांचे इतिहास आणि कल्पित हे असेच एक दुर्मिळ झालेले अप्रतिम पुस्तक. ललित साहित्यातून अनेकदा चुकीचा इतिहास मांडला जातो. साहित्यिक कधी कधी अवाजवी स्वातंत्र्य घेतात. सेतुमाधवरावांनी आपल्या नर्म विनोदी, खुसखुशीत शैलीत अनेक ललित साहित्यकृतींचा परामर्श घेऊन खरा इतिहास कथन करीत सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर घातली आहे. ललित साहित्यात संभाजी महाराजांवर झालेला अन्याय, राणी पद्मिनीची कहाणी व त्या मागचे सत्य, घाशीराम कोतवाल प्रकरण या व अशांसारख्या अनेक बाबींवर सप्रमाण असा प्रकाश पगडींनी टाकला आहे. या शिवाय इतिहास संशोधन करतांना आलेले मजेदार अनुभव तसेच इतरही काही मनोरंजक स्फुट लेख या संग्रहात आहेत. माझ्या वडिलांच्या महाविद्यालयातील ग्रंथालयातून आणलेले हे पुस्तक मी दोनदा वाचले आहे. शेवटचे २००४ साली वाचले. त्याची अवीट गोडी अजून स्मरते. आज हे पुस्तक प्रकाशनात नाही. अलिकडे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या समग्र सेतुमाधवराव पगडी च्या खंडांमध्ये हे पुस्तक आहे. पण त्याची स्वतंत्र आवृत्ती निघणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.
महाभारत हा सुद्धा अभ्यासकांच्या कायम कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय राहिला आहे. चिंतामण विनायक वैद्य यांनी महाभारताचे सुरस मराठी भाषांतर केले व या भाषांतरानंतर महाभारताचा उपसंहार लिहिला. या उपसंहारात त्यांनी महाभारताचा कालनिर्णय, महाभारताचे कर्ते कोण, तसेच महाभारत हे काल्पनिक आहे काय, त्यावेळची समाजस्थिती आदि प्रश्नांचा अत्यंत चिकित्सक पणे उहापोह केला आहे. हे पुस्तक सुद्धा गेली अनेक वर्ष आवृत्तीत नव्हते. पण नुकतीच प्रफुल्लता प्रकाशन, पुणे यांनी या पुस्तकाची आवृत्ती काढली. ती हाती आल्यावर अक्षरशः कुठे ठेवू कुठे नको असे झाले.
मात्र वैद्यांची एपिक इंडिया, महाभारत: ए क्रिटिसिझम व श्रीकृष्णचरित्र ही पुस्तके सुद्धा पुन्हा प्रकाशित होणे गरजेचे आहे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने तयार केलेली महाभारताची चिकित्सक आवृत्ती अभ्यासकांसाठी एक आवश्यक प्रमाण ग्रंथ आहे. ही आवृत्ती सुद्धा संपली आहे. तसेच नीलकंठ चतुर्धर या नगर जिल्ह्यातल्या कोपरगावच्या पंडिताने १७ व्या शतकात सिद्ध केलेली महाभारताची आवृत्ती (नीलकंठी प्रत) ही सुद्धा अनेक अभ्यासकांनी प्रमाण म्हणून वापरली. विविध काळी प्रसिद्ध झालेल्या महाभारताच्या आवृत्तींच्या तौलनिक अभ्यासासाठी ही प्रत सतत प्रकाशनात असणे गरजेचे आहे.
ऑन द मीनिंग ऑफ महाभारत हा डॉ. व्ही. एस. सुखटणकर या महापंडिताने लिहिलेला ग्रंथ आज छापील आवृत्तीत नाही. डॉ. सुखटणकर हे प्रसिध्द प्राच्यविद्याविशारद व भांडारकर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे एक संपादक होते. त्यांचा हा ग्रंथ सुद्धा अभ्यासकांसाठी अनमोल आहे.
आचार्य धर्मानंद कोसंबी हे पाली भाषेचे व बौद्ध धर्माचे प्रकांड पंडित होते. त्रिखंडपंडित व साधुचरित या पदव्यांनी ते ओळखल्या जात. निवेदन हे त्यांचे मराठीतील आत्मचरित्र तसेच ज.स. सुखटणकर यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र या दोन्हींची एकत्र आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या पत्नी सुधाताई अत्रे यांचे गोदातरंग तसेच पंडित नेहरूंच्या भगिनीं कृष्णा हाथीसिंग यांचे आत्मचरित्र विथ नो रिग्रेट्स (साने गुरुजींनी याचा ना खंत ना खेद म्हणून मराठी अनुवाद केला आहे) ही पुस्तके सुद्धा प्रकाशनात नाहीत ती असायला हवी. त्यांचे मोल मोठे आहे. स. ह. गोडबोले व मंगला गोडबोले यांनी पु. लं. च्या अमृतमहोत्सवानिमित्त खास तयार केलेला अमृतसिद्धी हा ग्रंथ अप्रतिम व संग्राह्य असा होता. त्याचीही, मला वाटते, मर्यादित प्रतींची एकच आवृत्ती निघाली व त्या नंतर हे पुस्तक दिसेनासे झाले. अजूनही त्याची आवृत्ती काढल्यास त्याची तडाखेबंद विक्री होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रिडल्स इन हिन्दुइझम व त्याला उत्तर म्हणून दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले रामकृष्णांचे कोडे: डॉ.आंबेडकरांच्या विचारांची छाननी ही दोन्ही पुस्तके वैचारिक चर्चेचा (ज्याला आपण इंटेलेक्चुअल डिबेट म्हणतो) उत्कृष्ट नमुना आहेत. पण ही दोन्ही पुस्तके आज दुर्मिळ झालेली आहेत.
नुकतेच निवर्तलेले महाराष्ट्र टाइम्स चे माजी संपादक व व्यासंगी विद्वान गोविंदराव तळवलकर यांनी सतत आपल्या वाचकांना उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय करून देणारी अप्रतिम पुस्तके लिहिली. त्यापैकी वाचता वाचता खंड १, पुष्पांजली खंड १, नौरोजी ते नेहरू व ग्रंथसंगती ही पुस्तके आता मिळीनाशी झाली आहेत. त्यांचीही आवृत्ती आता काढणे अत्यंत गरजेचे आहे,
प्रा. अ.का. प्रियोळकरांनी संपादित केलेले दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे चरित्र व आत्मचरित्र तसेच साक्षेपी समीक्षक डॉ. स. गं. मालशे यांचे १९ व्या शतकाचा आढावा घेणारे- गतशतक शोधिताना यांसारखी पुस्तके मराठी सारस्वताचा अमोल ठेवा आहेत. त्यांचे पुनर्मुद्रण होणे व ही पुस्तके आवृत्तीत असणे सर्वच मराठी रसिकांसाठी आवश्यक आहे.
प्रख्यात इतिहासकार वा. सी. बेंद्रे हे महाराष्ट्रातल्या तेजस्वी व तपस्वी इतिहास संशोधकांपैकी एक. त्यांनी मालोजीराजे, शहाजी राजे यांच्यापासून ते थेट संभाजी महाराजांपर्यंतचा भोसले घराण्याचा इतिहास लिहिला. यात त्यांच्या द्विखंडात्मक शिवचरित्राचाही समावेश आहे. ही पुस्तके अगदी आताआतापर्यंत उपलब्ध नव्हती. मात्र कोल्हापूरच्या पार्श्व प्रकाशनाने त्यांची आवृत्ती गेल्या वर्षी काढली. परंतु तरीही बेंद्रे यांची अनेक अद्वितीय म्हणावीत अशी पुस्तके आज प्रकाशनात नाहीत. यात विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या सुल्तानशाह्यांवरची त्यांची पुस्तके, तसेच साधन चिकित्सा हा ऐतिहासिक साधनांची पारख करायला शिकवणारा त्यांचा बेजोड ग्रंथ यांचा समावेश होतो. यांची सुद्धा आवृत्ती निघणे आवश्यक आहे.
मराठीतील काही गाजलेली व महत्वाची प्रवासवर्णने आज दुष्प्राप्य आहेत. यात डॉ. पां. वा. काणे यांचे युरोपचा वृतांत, पंडित रमाबाईं चा इंग्लंडचा प्रवास, डॉ. पां. दा. गुणे यांचे माझा युरोपातील प्रवास या पुस्तकांची नावे घेता येतील. अनंत काणेकरांचे गाजलेले प्रवास वर्णन धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे सुद्धा आता जुने झाले आहे. त्याची नवीन आवृत्ती प्रस्तावना व टिपांसह निघणे आवश्यक आहे.
श्री. म. माटे यांच्या उपेक्षितांचे अंतरंग या कथा संग्रहाने मराठी साहित्यात एकेकाळी बरीच खळबळ माजविली होतो. या ग्रंथाची आवृत्ती आता जुनी झाली आहे ती नव्या चिकित्सक प्रस्तावनेसह प्रकाशित होणे गरजेचे आहे.
अशी अनेक नावे सांगता येतील व ही यादी बरीच मोठी होऊ शकेल. परंतु मला ज्यांच्याबद्दल विशेष आस्था आहे अशा विषयांवरच्या पुस्तकांबद्दल मी लिहिले. ही सर्व पुस्तके प्रकाशित झाल्यास मराठी सारस्वताची मोठीच सेवा होणार आहे. संबंधित प्रकाशक दखल घेतील काय?