भाग्यवान वेड्यांची दुनिया…

पुस्तकांवरील पुस्तके म्हणजे बुक्स अबाउट बुक्स हा एक अत्यंत रमणीय साहित्यप्रकार आहे. वाचनाचे वेड असलेल्यांना तसेच पुस्तकांबद्दल व एकूणच ग्रंथव्यवहाराबद्दल आस्था असलेल्यांना अशी पुस्तके वाचण्यात एक अवर्णनीय आनंद मिळत असतो. इंग्रजीमध्ये अशी बुक्स ऑन बुक्स अनेक आहेत. निकोलस बास्बेन्स, अल्बर्तो  मॅन्गुएल हे तर या साहित्यप्रकारातील दिग्गज. निकोलस बास्बेन्सचे ‘ए जेन्टल मॅडनेस’, ‘एव्हरी बुक इट्स रीडर’, ‘अमंग द जेन्टली मॅड’ किंवा अल्बर्तो मॅन्गुएल चे ‘अ हिस्टरी ऑफ रीडिंग’, ‘लायब्ररी अॅट नाईट’ यांसारखी पुस्तके म्हणजे ग्रंथप्रेमींसाठी अनमोल ठेवा आहेत. काही वर्षांपूर्वी सुझान हिल या ब्रिटीश लेखिकेने वर्षभर नवी पुस्तके विकत न घेता स्वत:जवळचीच न वाचलेली निवडक पुस्तके वर्षभरात वाचून काढण्याचा संकल्प केला व तो पूर्ण झाल्यावर ‘हॉवर्डस एंड इज ऑन द लॅन्डींग- अ इअर ऑफ रीडिंग फ्रॉम होम’ हे सुंदर पुस्तक लिहिले.

पण मराठी मध्ये अगदी आता-आतापर्यंत अशा प्रकारच्या पुस्तकांची वानवा होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतल्या काही चोखंदळ व व्यासंगी वाचकांनी आपल्या वाचनाबद्दल, वाचनानंदाबद्दल तसेच एकंदरीत ग्रंथव्यवहाराबद्दल पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये निरंजन घाटे यांचे ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’, सतीश काळसेकरांचे ‘वाचणार्‍याची रोजनिशी’, नितीन रिंढे यांचे ‘लीळा पुस्तकांच्या’, निखिलेश चित्रे यांचे ‘आडवाटेची पुस्तके’ अशासारख्या पुस्तकांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. तत्पूर्वी गोविंदराव तळवलकर, अरुण टिकेकर यासारख्या व्यासंगी विद्वानांनी आपापल्या ग्रंथप्रेमाबद्दल व वाचनानंदाबद्दल लिहिले होते. गोविंदराव तळवलकर यांची ‘वाचता-वाचता’, सौरभ भाग १ व २ तसेच अरुण टिकेकर यांचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ ही अत्यंत वाचनीय पुस्तके आजही आपली लोकप्रियता टिकवून आहेत. या पुस्तकांमध्ये आणखी एका दुर्मिळ पुस्तकाचा समावेश करावा लागेल. ते पुस्तक म्हणजे भानू शिरधनकर यांचे ‘पुस्तकांची दुनिया’ हे होय. साहस कथा व शिकार कथा लिहिणारे जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध लेखक व पट्टीचे वाचक असलेले भानू शिरधनकर आता विस्मृतीत गेले आहेत. परंतु शिरधनकर जरी मुख्यतः साहसकथा व शिकारकथा लिहिणारे लेखक असले तरी मुळात ते एक अत्यंत चोखंदळ व व्यासंगी वाचक व ग्रंथप्रेमी होते. त्यांनी १९६७ साली पुस्तकांची दुनिया हे एक अप्रतिम असे पुस्तकांवरील पुस्तक लिहिले. आता हे पुस्तक दुर्मिळ व आउट ऑफ प्रिंट झाले आहे. पण सुदैवाने या पुस्तकाची एक पीडीएफ इंटरनेटवर मला मिळाली.

शिरधनकरांचे ग्रंथप्रेम इतके पराकोटीचे होते की त्यांनी केवळ ग्रंथप्रेमापोटी हौस म्हणून ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुस्तकांची दुनिया या पुस्तकात त्यांनी एकूणच ग्रंथव्यवहार, ग्रंथांची घ्यावयाची काळजी तसेच स्वतःचे वाचन याबद्दल लिहिले आहे. परंतु विशेष म्हणजे अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक, विद्वान व थोर महापुरुषांच्या वाचनप्रेमाबद्दल व व्यासंगाबद्दल सुद्धा त्यांनी अत्यंत दुर्मिळ, उपयुक्त आणि मनोरंजक अशी माहिती दिली आहे. त्यांच्या पुस्तकाचे मुख्यतः दोन भाग करता येतात. एका भागात त्यांनी सर्वसाधारण ग्रंथव्यवहार, ग्रंथालये, ग्रंथांची घ्यावयाची काळजी याबद्दल तसेच स्वतःच्या वाचनवेडाबद्दल व आपण केलेल्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहिले आहे व दुसऱ्या भागात त्यांनी अनेक प्रसिद्ध साहित्यिक व विद्वानांच्या ग्रंथ प्रेमाबद्दल, वाचनाच्या सवयींबद्दल व वाचनशैलीबद्दल लिहिले आहे.

या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे पुण्यात एके काळी सुप्रसिद्ध असलेले जुन्या व दुर्मिळ ग्रंथांचे विक्रेते श्री ढमढेरे यांची मुलाखत होय. एक स्वतंत्र प्रकरण म्हणून ही मुलाखत शिरधनकरांनी आपल्या पुस्तकात छापली आहे. ‘वाळूतील सुवर्णकण’ असे सार्थ शीर्षक या प्रकरणाला त्यांनी दिले आहे. १९५१ पासून ढमढेरे यांनी जुन्या पुस्तकांचा व्यवसाय करायला सुरुवात केली. या व्यवसायात ते कसे पडले, अनेक दुर्मिळ व जुने ग्रंथ त्यांनी कसे मिळविले आणि कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्तींना त्यांनी ते पुरविले याची अत्यंत मनोरंजक व यापूर्वी कधीही प्रकाशात न आलेली माहिती या प्रकरणातून आपल्याला मिळते.

‘आपल्याला वाचायला आवडेल, परंतु वाचायला वेळच मिळत नाही’, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र ही तक्रार कशी चुकीची आहे व रोजच्या रामरगाड्यातून थोडा थोडा वेळ जरी आपण काढला तरी एक माणूस आपल्या आयुष्यात किमान हजार-दीड हजार पुस्तके सहज कशी वाचू शकतो यावरही शिरधनकरांनी सप्रमाण लिहिले आहे.

अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या ग्रंथप्रेमाचे मनोरंजक किस्से आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. यात काहींचे ग्रंथप्रेम तर इतके पराकोटीचे होते की त्यासाठी त्यांनी चोरी सुद्धा केली आहे. आगाखान हे लहानपणापासूनच ग्रंथप्रेमी व पट्टीचे वाचक होते. त्यांची वाचनाची भूक एवढी जबर होती की घरातली सर्व पुस्तके वाचून संपवल्यानंतर आता पुस्तके कुठून आणायची याचा त्यांना प्रश्न पडत असे. लहान असल्यामुळे घरून पुस्तकांसाठी पैसे मिळण्याचा संभव नव्हता. त्यामुळे आगाखान व त्यांचे बंधू हे मोठे झब्बे घालून एका पुस्तकाच्या दुकानात जात असत व हवी ती पुस्तके चोरून त्यात लपवून ते आणीत असत आणि आपली वाचनाची भूक भागवीत असत. एकदा ही चोरी पकडली गेली व त्याबद्दल आगाखान यांना त्यांच्या चुलत्याने केलेली शिक्षा सुद्धा भोगावी लागली. मात्र त्यानंतर त्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी ठराविक रक्कम घरून मिळू लागली. हे व असे अनेक मनोरंजक किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे, थोर साहित्यिकांचे वाचन कशा प्रकारचे होते, त्यांचा व्यासंग त्यांनी कसा वाढविला याबद्दल सुद्धा अतिशय प्रेरक व मनोरंजक माहिती शिरधनकर देतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या ग्रंथप्रेमाचे किस्से या पुस्तकात आले आहेत. त्यात न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, सर नारायणराव चंदावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ चिंतामणराव देशमुख, डॉ वि भि कोलते, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, सर विन्स्टन चर्चिल, श्री गोळवलकर गुरुजी, महाराज सयाजीराव गायकवाड, आचार्य धर्मानंद कोसंबी, संस्कृत पंडित डॉ के ना वाटवे, श्री म माटे, विठ्ठलराव घाटे, वि स खांडेकर, यासारख्या महापुरुषांचा व थोर साहित्यिकांचा समावेश आहे. अशा महापुरुषांचा व्यासंग, त्यांचे वाचनप्रेम, त्यांचे ग्रंथप्रेम याबद्दल वाचून अवर्णनीय आनंद तर मिळतोच, परंतु आपल्यालाही प्रेरणा मिळते. डॉ बाबासाहेब आंबेडकर आपण घरात असू तेथे हवे ते पुस्तक सहज हाती पडावे म्हणून एकेका पुस्तकाच्या पाच-पाच प्रती विकत घेत. भाऊसाहेब खांडेकर तर औषधे आणायला म्हणून निघत ते पुस्तके घेऊन परत येत. मग औषधांचीही गरज उरत नसे. आवडत्या पुस्तकाच्या सान्निध्यातच प्रकृती बरी होत असे. या सर्व थोर पुरुषांनी केवळ वाचायचे म्हणून वाचले नाही, तर आपल्या वाचनाचा व व्यासंगाचा आपल्या जीवनात सार्थ उपयोगही करून घेतला. यासंबंधी अनेक रंजक गोष्टी शिरधनकरांनी आपल्या पुस्तकात दिल्या आहेत. या पुस्तकाला सिद्धार्थ महाविद्यालयाचे तत्कालीन ग्रंथपाल व सुप्रसिद्ध व्यासंगी ग्रंथप्रेमी शा. शं. रेगे यांची प्रस्तावना लाभली आहे. आता हे पुस्तक दुर्मिळ झाले आहे. परंतु मराठीत पुस्तकांवरील पुस्तके या प्रकारात शिरधनकर यांच्या या पुस्तकाचे नाव सन्मानपूर्वक घ्यावे लागेल इतके हे पुस्तक उत्तम आहे. याची छापील आवृत्ती निघाल्यास सर्व ग्रंथप्रेमींसाठी ती एक पर्वणी ठरेल यात शंका नाही. हे पुस्तक इंटरनेटवर archive.org या वेबसाईटवर PDF स्वरूपात उपलब्ध आहे. ते सहज डाऊनलोड करून वाचता येईल.

मनोरंजनाच्या उथळ साधनांनाच ज्ञानाचे व आनंदाचे स्त्रोत समजण्याच्या आणि सांस्कृतिक कुपोषणाच्या या काळात हाती आवडते पुस्तक घेऊन भोवतालच्या जगाला विसरून त्यात गढून जाण्यात काय अवीट आनंद असतो याची नवीन पिढीला (व त्यांच्या आईवडिलांनाही) जाणीव करून देणारी अशी पुस्तके आणखी खूप हवी आहेत.

पुस्तकांची दुनिया

भानू शिरधनकर

अभिनव प्रकाशन, १९६७

https://archive.org/details/in.ernet.dli.2015.310180

2 thoughts on “भाग्यवान वेड्यांची दुनिया…

Leave a comment