कल्पतरूंचे आरव …

आज २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. भाषाप्रभू शेक्सपिअरची जयंती व पुण्यतिथी दोन्ही. त्याच्याच गौरवार्थ/ स्मरणार्थ आजचा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

माणसांनी पुस्तके निर्माण केली आणि पुस्तकांनीही माणसे घडविली. माणूस आणि पुस्तके यांच्यात असे एक रम्य अद्वैत आहे. पुस्तकांनी माणसाला काय दिले नाही? ज्ञान तर दिलेच, पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या जीवाला दिलासा दिला, त्याला विरंगुळा दिला, त्याच्या जखमांवर फुंकर घातली, तर कधी निराश मनाला उभारी दिली. सृजन ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. त्याला सतत व्यक्त व्हावेसे वाटते. सर्जनातूनच तो व्यक्त होतो. ‘मुझे कुछ कहना है’-  मला काही सांगायचंय – या सनातन उर्मीतून अभिव्यक्ती येते. मग कुणी कुठल्या तर कुणी कुठल्या माध्यमातून व्यक्त होतो. कुणी गातो, कुणी चित्रे काढतो, कुणी कविता करतो, कुणी कथा-कादंबऱ्या लिहितो, कुणी व्याख्यान देतो तर कुणी नुसते  गप्पांचे फडच रंगवतो. कितीतरी तऱ्हा अभिव्यक्तीच्या ! अगदी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढणाऱ्या गृहिणीलासुद्धा त्यातून काही सांगायचे असते.

अभिव्यक्तीच्या याच सनातन उर्मीतून माणूस लिहायला लागला. ग्रंथ जन्मले, तसेच ग्रंथवेडेही जन्मले. वाचनाचा छंदच मुळी भाग्यवानांना लाभतो आणि त्याहून भाग्यवानांचा हा छंद वेडात रुपांतरित होतो. हे वेडही भाग्याचे. कधीकधी प्रश्न पडतो – माणसे हे वेड जन्माला घेऊनच येतात की त्यांना ते नंतर लागते? मला वाटते दोन्ही गोष्टींत थोडेथोडे तथ्य आहे. सुप्त बीजावास्थेतले ग्रंथवेड खतपाणी मिळताच फोफावते. याच वेडात तल्लीन होऊन वाचत बसणे हा सर्वांत मोठा आनंद आहे असे मी मानतो. अगदी निर्विकल्प समाधीच्या खालोखाल मी त्याला स्थान देईन. माझी सुखाची कल्पना एकच आहे – शांतपणे बेताच्या थंड व प्रसन्न वातावरणात शुचिर्भूत होऊन आपल्या अभ्यासिकेत खूप वेळ वाचत बसणे. आताशा वाचनसमाधी लागणे दुरापास्त झाले आहे. विचलित करणाऱ्या व व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी खूप आल्या आहेत. पण व्यवधाने पुष्कळ असली तरी वाचायची ओढ मात्र कायम आहे. शिक्षकी पेशात असल्याने विषयाशी संबंधित सक्तीचे वाचन सतत करावेच लागते. त्यात सांसारिक कर्तव्ये पार पाडायची असतात. मग वाचायला हवा तसा आणि हवा तितका वेळ मिळत नाही. विद्यार्थी असतांना (१९८९-२००२) तो मिळायचा. तेव्हां सगळ्या वेळेवर आपलाच हक्क असायचा. तेव्हां गूगल, फेसबुक, व्हॉटसअॅप इत्यादी व्यवधाने नव्हती. एकाग्रता बऱ्यापैकी लवकर साधायची. ३-४ दिवसांत हजारभर पानेही सहज वाचून व्हायची. आता फार वेळ एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे अवघड झाले आहे. इंटरनेट व स्मार्टफोनमुळे एका ठिकाणी दीर्घकाळ लक्ष टिकतच नाही. काही वर्षांपूर्वी अटलांटिक मासिकात ‘इज गूगल मेकिंग अस स्टुपिड?’ या शीर्षकाचा एक लेख वाचला होता. त्यात लेखकाने म्हटले होते की इन्टरनेटवर सर्च करताना एका कुठल्या वेबसाईट वर धडपणे थांबून तिथली माहिती नीट वाचण्यापूर्वीच आपण दुसऱ्या एखाद्या लिंकवर क्लिक करतो. मग तिसऱ्या, मग चौथ्या आणि शेवटी आपण काय शोधत होतो आणि इथपर्यंत कसे आलो हे आपले आपल्यालाच आठवत नाही. या सवयीमुळे एका ठिकाणी फार वेळ चित्त एकाग्र करण्याची क्षमता आपण गमावून बसलो आहोत. याच लेखात लेखक आपल्याला विचारतो की तुम्ही हजारेक पानांचे एखादे पुस्तक शेवटचे कधी वाचले होते हे आठवून पहा. ही सवयच आपण आज या वेगवान डिजिटल युगात गमावून बसलो आहोत. आणि सोबतच त्याचे फायदेही गमावून बसलो आहोत. हातात पुस्तक घेऊन एकाग्रतेने वाचण्याने सहज मेडीटेशन- म्हणजे ध्यान- होते. त्याची सर स्क्रीनवरच्या वाचण्याला नाही येत व त्याचे तसे फायदेही नाही होत. एकूण काय, तर पूर्वी ग्रंथालयांशिवाय पर्याय नव्हता. पुस्तके विकत घ्यायची तर मोजकेच पैसे जवळ असत व खामगावसारख्या छोट्या शहरात क्रमिक पुस्तके सोडून इतर पुस्तके फारशी मिळत नसत. (आताही मिळत नाहीत). दर्जेदार व वाचनीय पुस्तकांची दुकाने, मुंबई, पुणे नागपूर अशा मोठा शहरांतच होती व आजच्यासारखी ऑनलाईन पुस्तके विकत घेण्याची सोय जवळपास २००० सालापर्यंत नव्हतीच. पुढे ही सोय झाली तरी खामगावसारख्या छोट्या शहरांपर्यंत या विक्रेत्यांचे जाळे पोचले नव्हते. मला आठवते, माझ्या ग्रंथसंग्रहाची खरी सुरुवात २००१ पासून झाली. एका मित्राकडे इंडिया टुडे येत असे. त्यावेळी इंडिया टुडे ने एक बुक क्लब सुरु केला होता व दर दोन महिन्याला बुक्स टुडे नावाचे एक पुरवणीवजा नियतकालिक या बुक क्लबचे मुखपत्र म्हणून ते प्रसिद्ध करत. या बुक्स टुडे मध्ये त्या दोन महिन्यात विविध विषयांवरची उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तके खूपच सवलतीत उपलब्ध असत. मित्राकडून दर दोन महिन्यांनी मी बुक्स टुडे चा अंक आणीत असे आणि त्यातली पुस्तके पाहत असे, त्यांचे ब्लर्बस  वाचत असे. त्यातूनही खूप आनंद मिळायचा. मग हळूहळू घरच्यांच्या परवानगीने व प्रोत्साहनाने दर दोन चार महिन्यांनी त्यातील एखाद-दुसरे पुस्तक मागवायला लागलो. पुढे २००२ साली माझ्या काकांनी मला या बुक क्लबचे सभासदत्वच भेट दिले व स्वागतभेट म्हणून इंडिया टुडे ने खास बुक क्लब च्या सभासदांसाठी तयार करवून घेतलेली समग्र शेक्सपिअर ची ब्राऊन कातडी बांधणीची सोनेरी अक्षरे असलेली सुंदर प्रत मिळाली. तो आनंद केवळ अपूर्व होता. या बुक क्लबने मला खूप मौल्यवान पुस्तके खूपच कमी दरांत उपलब्ध करून दिली. २००३ पासून मात्र का कुणास ठाऊक, पण हा बुक क्लब बंद पडला. तेव्हां खूप वाईट वाटून पुन्हा क्लब सुरु करावा असे अनेक विनंतीवजा इमेल्स त्यांना पाठवले. आजही वाटते हा क्लब पुन्हा सुरु व्हावा. इतिहासातील सर्व प्रमुख लढायांची सारांशरूपात माहिती देणारे द बॅटल बुक हे अप्रतिम व दुर्मिळ पुस्तक याच क्लबच्या माध्यमातून मला मिळाले. मॅक्समुल्लरचे  आत्मचरित्र,  हेन्री  डेरोझियो चे चरित्र अशी त्यावेळी (व आताही) दुर्मिळ व मौल्यवान असलेली पुस्तके इंडिया टुडे बुक क्लबनेच उपलब्ध करून दिली. पुढे इंडिया टुडे बुक क्लब बंद झाल्यावर ऑनलाईन बुकस्टोअर्स च्याच माध्यमातून पुस्तकांची खरेदी होऊ लागली. आता अॅमॅझॉन भारतात आल्यापासून तर अलिबाबाची गुफाच गवसल्या सारखे झाले आहे. यथावकाश मराठी पुस्तकेही ऑनलाईन मिळू लागली. ग्रंथद्वार डॉट कॉम आणि त्यांच्या तत्पर संचालिक हर्षदा भुरे-बावनकर किंवा आता बुकगंगा डॉट कॉम यांच्यामुळे मराठी पुस्तकांनीही माझा संग्रह नटला.

आता पैसे आहेत,एका क्लिकसरशी पुस्तके घरपोच उपलब्ध करून देणारी ऑनलाइन बुक स्टोअर्स आहेत आणि कुणालाही हेवा वाटावा असा स्वतःचा ग्रंथसंग्रहही जमला आहे पण पण निवांतपणा दुर्मिळ झालाय. आपल्या स्वतःच्या अभ्यासिकेत म्हणा की पुस्तकांच्या दुकानात म्हणा किंवा ग्रंथालयात म्हणा पुस्तकांच्या कपाटांसमोर उभे राहून त्यात हरवून जाण्यासारखा आणि त्यातील ग्रंथसंपदेच्या दर्शनाने हरखून जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. अगदी खेळण्यांच्या दुकानात लहान मुलाचे व्हावे तसे होते. काय वाचू अन् काय नको असे होऊन जाते. कितीही ऑनलाईन स्टोअर्स येऊ देत – पण अजूनही मुंबईला गेलो म्हणजे फोर्टमध्ये ‘किताबखाना’ त गेल्यावाचून करमत नाही आणि एकदा आत गेलो की बाहेर निघावेसे वाटतच नाही. आणि तिथून निघालोच तर फ्लोरा फौंटन ला हुतात्मा चौकात फुटपाथवरच्या जुन्या पुस्तक विक्रेत्यांच्या राशीतून काहीतरी घबाड मिळविल्याशिवाय यात्रा पूर्ण झाली असे वाटत नाही.

पुस्तके येत राहतात आणि वाकुल्या दाखवत जणू मला लाजवत राहतात. अनेक पुस्तके वाचण्याचे दरवर्षी संकल्प होतात. काही पूर्ण होतात तर काही अर्धवट राहतात. जागतिक पुस्तक दिन या सगळ्या संकल्पांची आज आठवण करून देतो आहे आणि माझी पुस्तके जणू मलाच जाब विचारत आहेत- आम्हाला शोभेसाठी आणले का?

पुस्तकांचा संग्रह जसजसा संख्येने व दर्जाने वाढतो, तसतसे आपण आपल्या पुस्तकांच्या बाबतीत खूप पझेसिव होत जातो.  पुस्तक समोर दिसतंय म्हणून उगीच वाचायला मागणारे कॅज्युअल वाचनप्रेमी टाळणे हे एक जिकीरीचे  काम होऊन बसते. ‘देखल्या देवा दंडवत’ करणारी ही खुशालचेंडू मंडळी बऱ्याचदा वैताग आणतात. मग प्रसंगी वाईटपणा पत्करूनही नकार द्यावा लागतो. असे हौसराव मला तरी आवडत नाहीत आणि मला वाटते कोणत्याच अस्सल ग्रंथप्रेमी व्यक्तीला आवडत नाहीत. त्यामुळेच मी माझी पुस्तके फारशी कुणाला वाचायला देत नाही. हा नकार ऐकणाऱ्याला रुचत नसला तरी पुस्तके मिळविण्यासाठी पैसे सोडून आणखीही अनेक गोष्टी लागतात. उत्तम ग्रंथसंग्रह उभा करणे ही फार खडतर तपश्चर्या आहे. ती ज्याची त्यानेच करायची असते. त्यासाठी पडणाऱ्या कष्टांची इतरांना कल्पना येणे फार दुरापास्त आहे. दिसली म्हणून पुस्तके मागून नेणारे कधीच अस्सल वाचनप्रेमी नसतात असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांचे वाचनप्रेम पुस्तक पाहून उफाळून येते. एरवी स्वतःहून पुस्तके जमविण्यासाठी, वाचण्यासाठी ते कोणतेच कष्ट घेत नाहीत. असो. पण असे असले तरी माझ्याजवळील पुस्तकांची माहिती शेअर करायला व ते मिळवायचे कसे ते सांगायला मी नेहमी तयार असतो. मात्र पुस्तकांच्या बाबतीत Neither a borrower, nor a lender be हे शेक्सपिअरचे म्हणणे मी कटाक्षाने अमलात आणतो. याला अर्थातच सन्माननीय अपवाद आहेतच. पण ते अपवादाचा नियम सिद्ध करण्यापुरतेच. ज्यांना आपण होऊन आपली पुस्तके वाचायला द्यावी व त्यांनी ती वाचल्याचे समाधान त्यांच्याहून अधिक आपल्याला व्हावे असे जातिवंत ग्रंथप्रेमी मित्र मलाही लाभले आहेत. त्यांची संख्या फारच कमी असली तरी त्यांचे असणे हेच काय कमी आहे?

काय वाचावे हा प्रश्न मला अनेक लोक – विशेषतः माझे विद्यार्थी मित्र अनेकदा विचारतात. या प्रश्नाला उत्तर देण्याइतका अधिकारी माणूस मी नाही. पण तरी सांगावेसे वाटते की हाताला लागेल ते वाचा. भेळेच्या कागदापासून ते शेक्सपियर पर्यंत मिळेल ते आणि मिळेल त्या माध्यमातून वाचा. मासिके वाचा, छापलेली पुस्तके वाचा, ई-बुक्स वाचा, किंडलवर वाचा, संगणकावर वाचा, घरी वाचा,  बाहेर वाचा, ज्या ज्या  भाषा येतात त्याच्या सर्व भाषांत वाचा. आधी वाचायला सुरुवात करा मग हळूहळू आवडनिवड तयार होईल.

अस्सल व भक्कम असे जागतिक कीर्तीचे ग्रंथराज वाचावेत आणि त्यांच्याबद्दल स्वतःला काय वाटते ते लिहावे, तो वाचनानंद इतरांसोबतही वाटून घ्यावा आणि यातच संपूर्ण आयुष्य व्यतीत करावे हीच माझ्या जीवाची आवडी आहे. कुठेतरी गाडगेबाबांचे एक वाक्य वाचल्याचे आठवते. बाबा म्हणतात- “ज्याच्या घरी नाही पुस्तकांचं कपाट, त्याचं घर होईन सपाट.” आता हे वाक्य खरंच बाबा बोललेत का हे माहित करून घेण्याचा फंदात मी पडलो नाही. कारण एक तर त्या वाक्यात तथ्य आहे आणि दुसरे बाबांच्या विचारधारेशी ते सुसंगत आहे. विठ्ठलाची गोडी लागायला जशी बहुत सुकृताची जोडी लागते तशीच ग्रंथांची गोडी लागायला ही ती लागते असे पु. ल. देशपांडेंनी म्हटले आहे. ही गोडी असणे यापरते भाग्य दुसरे नाही. मला ते कुठल्या पूर्वसुकृतामुळे लाभले हे माहित नाही. पण असे भाग्य सर्वांना लाभो आणि पुस्तकांची दुनिया सदैव आबाद होत राहो हीच आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रार्थना व शुभेच्छा !

6 thoughts on “कल्पतरूंचे आरव …

    • पृथ्वी तुझा लेख वाचला. खरं आहे आज आपण ईंटरनेट च्या जगात एवढे गुरफटत चाललो आहोत की आपल्याकडे चांगली पुस्तके वाचायला वेळच नाही. खरं म्हणजे ग्रंथाची गोडी निर्माण होणं हे आजच्या युगात गरजेचं आहे. “ज्यांच्या घरी नाही पुस्तकांच कपाट मी तर म्हणेल त्याचं पुर्ण जीवन सपाट”
      अतिशय सुरेख लेख. धन्यवाद

    • लेखाचे टायटल संताच्या ओळीने सूरू झाले छान वाटले

      मला येथे असे नमूद करावेसे वाटते

      साधू ऐसा चाहीये जैसे सुप सुभाय !

      सार सार गही रहे थोथा दीये ऊडाय !!

      कबीर

  1. खुप सुंदर शब्दांकन.
    पहिले पैसे नसतात, मग वेळ नसतो व पुढे निवृत्त झाल्यावर दोन्ही असते पण शरीर थकते.
    म्हणुन असे काहीतरी करून जावे फुल न फुलाची पाकळी की त्याचा सुगंध इतरांसाठी दरवळत राहावा.
    शुभेच्छासह!
    हेमंत खेडकर

  2. अप्रतिम शब्दांकन वाचक आणि ग्रंथप्रेमी, उत्कृष्ट लेखक अशा एक ना अनेक आपल्या अंतरंगातील छटा आपल्या विचारामधून डोकावतात. अत्यंत प्रेरणादायी लेख आपले मनापासून अभनंदन व जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा
    धनंजय

  3. Thank you so much for this generous praise Sir. Your encouragement is always very precious for me. Thanks indeed !

Leave a comment