पाच-सातशे पुस्तके असतील माझ्या संग्रहात फारतर. पण माझी अभ्यासिका भरायला तेवढीही पुरेशी आहेत. तेवढीच पुस्तके पाहून लोक मला विचारतात- “एवढी सगळी पुस्तकं तुम्ही वाचली आहेत?” कोणी म्हणतं- “एवढी पुस्तकं तुम्ही वाचणार कधी?”
त्यांच्या परीने त्यांचे प्रश्न बरोबर आहेत पण त्यांना काय सांगावं हाच मला प्रश्न पडतो. पुस्तकं का जमवायची, किती जमवायची, का वाचायची आणि वाचून काय करायचं- हे प्रश्न ज्या पिढीला पडतात तिच्या सांस्कृतिक पातळी बद्दल न बोललेलंच बरं. मला ओरडून सांगावेसे वाटते- “बाबांनो, मला आवडतं, आनंद होतो म्हणून मी वाचतो. पुस्तकांचा सहवास, स्पर्श, त्यांचा गंध, हे सर्व आवडतं मला. आणि मुख्य म्हणजे खामगाव सारख्या छोट्या शहरात मला हवी असलेली किंवा नवीन अशी इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत पुस्तकं उपलब्ध करून देणारं समृद्ध ग्रंथालय नाही. मग पुस्तक विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. आणि ग्रंथालय असतं तरी मी पुस्तकं विकत घेऊनच वाचली असती. कारण चांगली पुस्तकं म्हणजे संपत्ती आणि संपत्ती स्वतःची असली तरच तिचा मनसोक्त उपभोग घेता येतो आणि तिची ऐट मिरवता येते. माझ्या वाचनाचा वेग माझ्या पुस्तक खरेदीच्या वेगापेक्षा अर्थातच कमी आहे. तसा तो सर्वच ग्रंथाप्रेमींचा असतो. मी कुठेतरी वाचलं होतं कि माणूस आयुष्यभरात सहा-सात हजार पुस्तकं वाचू शकतो. हे खरं असेल तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास ४४०००, डॉ. रा. चिं. ढेरे यांनी जवळजवळ ४०००० आणि त्याहून वरचढ म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक श्यामलाल यांनी तब्बल नव्वद हजारांच्या वर पुस्तकं जमवली होतीच ना? पाश्च्यात्यांचे ग्रंथप्रेम तर आपल्यापेक्षा खूप जास्त आणि खूप श्रेष्ठ प्रतीचे आहे. त्यांच्याकडे तर अशी उदाहरणे खो-यांनी सापडतील. उम्बर्तो इको या इटालियन समीक्षकाकडे तीस हजारांचा समृद्ध ग्रंथसंग्रह होता. निस्सीम तालेब हा लेखक न वाचलेल्या पुस्तकांना anti-library म्हणतो. असा समृद्ध ग्रंथसंग्रह आजूबाजूला असला म्हणजे माणूस सतत एका अभिरुचीसंपन्न सहवासात व सुखावह अशा वातावरणात असतो. आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाहीत, अनेक क्षेत्रे आपल्यासाठी अज्ञात आहेत, अनेक पुस्तके आपल्याला अजून वाचायची आहेत याचे भान त्याला सदैव असते. आपल्या अज्ञानाची जाणीव त्याला सावध ठेवते. मनाला कोतेपण येऊ देत नाही.
आता राहिला प्रश्न वाचून काय करायचं हा. तर काही साध्य करण्यासाठीच वाचावं असं काही नसतं आनंदासाठीही वाचायचं असतं. आजच्या जगात निखळ आनंदासाठी सुद्धा काही करायचं असतं ही कल्पनाच लोकांना करवत नाही. वाचणे, संगीत ऐकणे, मित्रांमध्ये रमणे, निसर्गात रमणे या आणि अशा गोष्टी केवळ आनंदासाठी करायच्या असतात ही कल्पनाच आपल्या पिढीच्या लोकांसाठी अपरिचित आहे. निखळ आनंदासाठी वाचावे. इतर साध्य तर असतातच मग. कधी संशोधनासाठी, कधी माहितीसाठी, कधी लिहिण्यासाठी, कधी एखाद्या विषयाचा विशेष अभ्यास करण्यासाठी वाचावं लागतंच. पण सर्वोच्च व अभिजात स्वरूपाचा आनंद मिळतो तो अहेतुक वाचनातून. कोणाला हा आनंद कथा-कादंबऱ्यातून मिळेल, कोणाला कवितेतून, नाटकातून किंवा इतर ललित साहित्यातून मिळेल किंवा कोणाला इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान किंवा राजकारणाबद्दल वाचून मिळेल. त्यांची जातकुळी मात्र सारखीच. मला हे कळतं की मी कदाचित आयुष्यात जमवलेली सर्वच पुस्तकं वाचू शकणार नाही. पण तरीही मी पुस्तकांचा संग्रह करणे सोडणार नाही. ज्याप्रमाणे आपण श्वासांचा हिशेब मांडून ठेवत नाही, तसा वाचनातून होणाऱ्या नफा-नुकसानीचा ही ताळेबंद मांडू नये. निखळ आनंदासाठी करावयाच्या ज्या गोष्टी असतात त्या हिशेबाच्या पलीकडे असतात. त्यांना हिशेबाच्या पलीकडेच ठेवावे. आणि हो, हा आनंद वाटायला विसरू नये. वाटल्याने तो शतपटीने वाढतो.
वाचनाचा आवाका जसाजसा वाढतो, तसातसा अनेक पुस्तकांसोबत परिचय होतो. काहींशी गाढ मैत्री होते, काही जुन्या नव्या पुस्तकांबद्दल माहिती मिळत जाते आणि वाचनानंद वर्धिष्णू होत जातो.