मराठी माणूस जात्याच वाचनप्रेमी आहे असं मला सतत वाटत आलं आहे. तो वाचनाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ आहे. वाचायची सवय आजकाल कमी झालेली आहे व त्यातल्या त्यात मराठी साहित्याला तर फार वाईट दिवस आले आहेत ही सार्वकालिक खंत आजही (कदाचित आधीपेक्षा थोड्या अधिक तीव्रतेने) व्यक्त होत असते. पण आजही चांगलं काही वाचायला मिळालं की त्यावर वाचकांच्या उड्या पडतात. मराठी साहित्याला उत्तमोत्तम साहित्यिक नियतकालिकांची एक वैभवशाली परंपरा राहिली आहे. साठ व सत्तर च्या दशकात तर सत्यकथा, मौज, किर्लोस्कर, माणूस, ललित यांसारख्या एकाहून एक सरस नियतकालिकांत त्यावेळचे नामवंत तसेच नव्या दमाचे प्रतिभावंत लिहीत होते. वाचकांना सकस ललित व वैचारिक साहित्याची मेजवानी मिळत होती. वाद झडत होते. आज मात्र यांतील बहुतेक गाजलेली नियतकालिके बंद झाली आहेत. काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नुकतीच झालेली ‘अंतर्नाद’ ची एग्झिट मनाला चटका लावून गेली.
आज तिशीत असलेल्या माझ्या पिढीने मराठी नियतकालीकांचा हा सुवर्णकाळ पहिला/अनुभवला नाही. त्यामुळे या नियतकालीकांतील साहित्य व विचारधन यांपासून आम्ही वंचित राहिलो होतो. पण ही उणीव नेमकी हेरून ती भरून काढण्याचे काम ‘पुनश्च’ ने केले. न मागताच मराठी रसिकांना मिळालेली ही एक अभूतपूर्व देणगी आहे. कुठल्यातरी मंगल क्षणी श्री किरण भिडे यांना जुन्या-नव्या मराठी नियतकालिकांतील साहित्य व विचारधन मोबाईल अॅप च्या माध्यमातून अत्यंत नाममात्र दरांत मराठी रसिकांपुढे ठेवण्याची अभिनव कल्पना सुचली आणि त्यांनी लगेच ती प्रत्यक्षातही उतरविली. एक दिवस लोकसता मध्ये पुनश्च वरचा लेख वाचला आणि हरखून गेलो. ठरवलं की पुनश्च चा सभासद व्हायचंच आणि लगेच झालोही. गुढीपाडवा २०१७ पासून दर बुधवार-शनिवारी लेख यायला सुरुवात झाली. पु. लं., प्रा. पु. ग. सहस्रबुद्धे, आचार्य अत्रे, गौरी देशपांडे यांसारख्या दिग्गजांचे, तर काही टोपणनावाने लिहिलेले, जुन्या दर्जेदार मासिकांमधले लेख वाचायला मिळू लागले. अवांतर आणि नि:शुल्क सदरांत समकालीन विषयांवरचे स्फुट लेखही वाचायला मिळू लागले.
पुनश्च ने भीमा-कोरेगाव वादाच्या वेळी महाराष्ट्र पेटलेला असतांना व सोशल मीडियावर उठवळ लिखाणाचा पूर आलेला असताना आपल्या वाचकांसमोर ‘इंग्रजांचं भीमा-कोरेगांव’, ही अभ्यासपूर्ण व सप्रमाण तथ्य मांडणारी लेखमाला प्रसिद्ध केली. माझ्या मते हे गेल्या वर्षभराच्या वाटचालीतले पुनश्च चे सर्वात भरीव योगदान आहे. या वादावर इतके अभ्यासपूर्ण लेखन मलातरी कुठेच वाचायला मिळाले नाही.
यांसोबतच डॉ यश वेलणकर यांचे मेंदू व मनोव्यापार यांविषयीचे लेख व तंबी दुराई यांचे (दत्तू बांदेकरांची आठवण करून देणारे व गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झालेले) राजकीय विडंबन ही पुनश्च ने केलेली दोन ‘व्हॅल्यू अॅडिशन्स’ आहेत.त्यांना दाद द्यावी तेवढी थोडी आहे. यापुढे इतिहासाचार्य राजवाडे, न. र. फाटक, दुर्गाबाई भागवत, सुनीताबाई देशपांडे, डॉ रा. चिं. ढेरे इत्यादी मान्यवरांचेही लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
पुनश्च चा आतापर्यंतचा प्रवास सुंदर झाला आहे. पुढे तो आणखी सुंदर व्हावा. अधिक यशस्वी व्हावा. रसिकांना ही मेजवानी अशीच मिळत रहावी. महाराष्ट्राच्या वाचनप्रेमाचा ‘पुनश्च’ हरि: ॐ झाला आहे. या रोपट्याचा वेलू लवकरच गगनावरी जावा हीच सदिच्छा.
वाचनाचा आवाका जसाजसा वाढतो, तसातसा अनेक पुस्तकांसोबत परिचय होतो. काहींशी गाढ मैत्री होते, काही जुन्या नव्या पुस्तकांबद्दल माहिती मिळत जाते आणि वाचनानंद वर्धिष्णू होत जातो.