आचार्य अत्रे, पु ल देशपांडे व कुसुमाग्रज म्हणजे गेल्या ६० वर्षाहूनही अधिक काळ मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे तीन जबरदस्त प्रतिभावंत. महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक इतिहासाला ज्यांच्याशिवाय पूर्णताच येणार नाही असे तीन थोर सरस्वतीपुत्र. ज्यांच्या साहित्याची मोहिनी, ज्यांचे गारुड आजही मराठी मनावर कायम आहे आणि कितीही वाचले तरीही ज्यांच्या साहित्याची गोडी कायमच अवीट राहिली आहे, असे हे थोर कलोपासक, रसिकाग्रणी. या तिघांपैकी आज कोणीही हयात नाही. मात्र अर्धशतकाहूनही अधिक काळ त्यांच्या साहित्याची मोहिनी महाराष्ट्रमनावर कायम आहे.या तिघांबद्दल परचुरे प्रकाशन मंदिराने नुकतीच तीन छान पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘अप्रकाशित आचार्य अत्रे’, ‘पुन्हा मी, पुन्हा मी’ व ‘सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज’ ही ती तीन पुस्तके. यापैकी अप्रकाशित आचार्य अत्रे हा अत्रेंच्या आजवर अप्रकाशित राहिलेल्या साहित्याचा संग्रह आहे. तसेच पुन्हा मी, पुन्हा मी हा पुलंच्या अप्रकाशित साहित्याचा संग्रह आहे तर सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज हा विविध मान्यवर साहित्यिक व समीक्षकानी कुसुमाग्रजांच्या हयातीत तसेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे.
पुलंना जाऊन त्यामानाने फार काळ लोटलेला नाही. त्यामुळे त्यांचे बरेच अप्रकाशित साहित्य प्रकाशित होत आहे. कदाचित आणखीही होईल. पुन्हा मी, पुन्हा मी या संग्रहापूर्वीही परचुरे प्रकाशन मंदिराने ‘गाठोडे’ व ‘पाचामुखी’ ही पुलंच्या अप्रकाशित साहित्याची दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत व ती सहज उपलब्ध आहेत. पुन्हा मी, पुन्हा मी हे या मालिकेतले तिसरे पुस्तक म्हणता येईल. २७ फेब्रुवारी २०१५ ला हे पुस्तक प्रकाशित झाले. मुखपृष्ठ व आतील व्यंगचित्रे अनेक वर्षांपासून पुलंची पुस्तके सजविणारे सिद्धहस्त व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची आहेत. त्यामुळे पुस्तक जणू पुलंच्या हयातीतच प्रकाशित झाले असावे असे वाटते. मात्र या संग्रहातील ‘एक हरपलेले प्रेय’ या कवितेतील रेखाटने ही श्रीराम बोकील यांची आहेत. या संग्रहात आजवर अप्रकाशित राहिलेले पुलंचे विनोदी व वैचारिक लेख, (विनोदी) कथा व कविता, व्यक्तीचित्रणे, प्रासंगिक लिखाण, तसेच काही भाषणे, मुलाखती व क्वचित एखादे पत्रही आहे. यातील काही साहित्य हे पुलंनी आपल्या उमेदवारीच्या काळात, म्हणजे १९४५-६० च्या दरम्यान लिहिलेले आहे. ‘सत्यकथा’, ‘साधना’, ‘अभिरुची’ यांसारख्या दर्जेदार व त्याकाळी लोकप्रिय असलेल्या नियतकालिकांमधून या लिखाणाला पूर्वप्रसिद्धी लाभलेली आहे. या संग्रहातील पुलंचे परमस्नेही श्री वसंत सबनीस यांनी घेतलेली पुलंची खुमासदार मुलाखत (सबनीस पुसे, देशपांडे सांगे) व श्री अरविंद औंधे यांनी घेतलेली काहीशी सिरीयस मुलाखत (माझ्या आयुष्यात फ्लूक्स वारंवार आले) या दोन्ही मुलाखतींतून पुलंचा हजरजबाबीपणा तसेच एक कलाकार व रसिक म्हणून त्यांचे स्वतःबद्दलचे स्वतःच्या साहित्यनिर्मितीबद्दलचे व एकूणच कलेबद्दलचे अत्यंत सुंदर व मूलगामी चिंतन आपल्याला दिसून येते. व्यक्तीचित्रणे लिहिण्यात पुलंचा हातखंडा. याही पुस्तकात पुलंनी त्यांना गुरुस्थानी असलेल्या मो. ग. रांगणेकरांचे सुंदर व्यक्तिचित्र रेखाटले आहे. दुसरे व्यक्तिचित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे आहे. बाबासाहेबांचे ‘गणगोत’ मध्ये पुलंनी लिहिलेले व्यक्तिचित्र तर सुप्रसिद्ध आहेच पण प्रस्तुत संग्रहातील “शिवरंगी रंगलेले बाबासाहेब पुरंदरे” हे तरुण भारत च्या बाबासाहेब पुरंदरे गौरव विशेषांकासाठी लिहिलेले व्यक्तिचित्रही अत्यंत वाचनीय झाले आहे. गणगोत वाचलेल्यांनासुद्धा अनेक वर्षानी लिहिलेले हे व्यक्तिचित्र तितकेच ताजे व वाचनीय वाटेल. विविध प्रसंगी पुलंनी केलेली तीन भाषणेही या संग्रहात आहेत. त्यातील ‘चंदनाचे हात, पायही चंदन’ हे साने गुरुजींवर केलेले भाषण गहिवर आणणारे आहे. गुरुजींच्या महत्तेचे अचूक शब्दांत व अत्यंत आत्मीयतेने केलेले हे वर्णन आहे. एकंदरीतच पुलंच्या अप्रकाशित साहित्याचे हे संकलन म्हणजे कथा, कविता, विनोदी लेख, व्यक्तिचित्रण, नाटिका, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत पु. ल. नावाच्या बहुरूपी खेळीयाने केलेल्या मनस्वी मुशाफिरीचे दर्शन घडवते. पु. लं. म्हणजे निखळ, निर्भेळ आणि अभिरुचीसंपन्न जीवनानंद, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना सदोदित येतो आणि का कोण जाणे, पण पुलंचे आणखी अप्रकाशित वाङमय लवकर प्रसिद्ध व्हावे अशी ओढ वाटते. लहान मूल जसे आपले चॉकलेट पुरवून पुरवून खाते तसेच हे पुस्तकही आपण पुरवून पुरवून वाचावे- नव्हे पुलंचा प्रसन्न सहवास संपूच नये असे वाटत राहते.

