
एक्स लिब्रिस : कन्फेशन्स ऑफ ए कॉमन रीडर हे अॅन फॅडिमन यांचे पुस्तक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुस्तकांवरील पुस्तके (books about books) या प्रकारांतील हे एक गाजलेले पुस्तक. वाचन व लेखन या दोन्हींवर लेखिकेचे अतोनात प्रेम आहे व आपल्याला मिळालेला वाचनानंद व आपल्या वाचनप्रवासातील विविध मजेशीर किस्से यांबद्दल लेखिकेने ओघवत्या व सुंदर इंग्रजीत लिहिले आहे.
श्रीमती फॅडिमन व त्यांचे पती दोन्ही व्यवसायाने लेखक. विवाहानंतर ते एकत्र राहू लागले तरी त्यांनी आपापले ग्रंथसंग्रह मात्र वेगवेगळे ठेवले होते. एक दिवस दोघांनीही आपापले ग्रंथसंग्रह एकत्र करण्याचे व त्यातली अतिरिक्त व अनावश्यक पुस्तके काढून ती एखाद्या ग्रंथालयाला देण्याचे ठरवले. मात्र प्रत्यक्षात हे करणे किती जड गेले व अतिरिक्त प्रती बाजूला काढतांनाही पती-पत्नी दोघांचेही आपापल्या प्रतींवर कसे प्रेम होते हे श्रीमती फॅडिमन आपल्याला पहिल्याच लेखात (Marrying Libraries) सांगतात. वाचतांना अडणारे अनवट व जुने शब्द, त्यांचे अर्थ, त्यांच्या उत्पत्ती, त्यांचा शोध घेण्यातली मजा, याबद्दलही मनोरंजक माहिती लेखिकेने दिली आहे. पूर्वीच्या वाचकांना अनेक शब्द व त्यांचे अर्थ, त्यांचे उपयोग यांची सखोल माहिती असे. त्यांचा शब्दसंग्रह अफाट असायचा. पण आजची पिढी शब्दसंग्रहाच्या बाबतीती तितकी श्रीमंत राहिली नाही असे लेखिकेला वाटते.
सॉनेट्स (सुनिते) वाचण्याची फॅडिमन यांना मनस्वी आवड आहे. आपल्या तरुणपणी आपणही हा काव्य प्रकार हाताळण्याचा प्रयत्न कसा केला हे त्या एका लेखात सांगतात.
आज लॅपटॉप व टॅब्लेट्स चे युग आहे. सलमान रश्दींसारखे अनेक प्रथितयश लेखकही आज आपल्या संगणकावरच थेट लिखाण करतात. मात्र आजही हाताने लिखाण करण्यात आनंद मानणारे अनेक लेखक आहेत. फॅडिमनही त्यातल्याच. आपले आपल्या पुस्तकांप्रमाणेच आपल्या फाउंटनपेन वर व इतर लेखन साहित्यावर कसे व किती प्रेम आहे व नेहमी स्वहस्ते लिखाण करूनच आपल्याला समाधान कसे मिळते याचेही सुंदर विवेचन फॅडिमन करतात. काही लेखक आपल्या जुन्या टाईपराईटरवरच लिखाण करणे योग्य समजतात. फॅडिमन यांच्या मते स्वहस्ते केलेल्या लिखाणाप्रमाणेच टाईपराईटरवर केलेल्या लिखाणाशी सुद्धा आपण काही अंशी जोडल्या जातो. पण संगणकावर लिहितांना तसे नाही. तिथे आपण रद्द केलेले लिखाण पुनरावलोकनासाठी उपलब्ध नसते.
वुडहाऊसने नव्वदच्या वर पुस्तके लिहिली. पण तो स्वतः आपल्या हाताने लिखाण करी. त्याने कधी टाईपराईटरचा वापर केला नाही अथवा लेखनिकाकडून लिहवून घेतले नाही. या उलट चर्चिल. त्यांनी नेहमी लेखनिकांचाच वापर केला.
फॅडिमन यांच्या या पुस्तकात अनेक गमतीदार किस्से व अनुभव आहेत. शेवटी शेवटी इंग्लंड चे माजी पंतप्रधान विलियम ग्लॅडस्टोन यांच्या ग्रंथप्रेमावर लिहिलेला एक सुंदर लेख आहे. ऑन बुक्स अँड द हाऊसिंग ऑफ देम ही एक छोटीशी पुस्तिका पंतप्रधान असतांना ग्लॅडस्टोन यांनी लिहिली होती. (गूगल बुक्स वर ती उपलब्ध आहे). ही पुस्तिका ग्लॅडस्टोन यांचा ग्रंथप्रेमाची साक्ष देते.
कुठल्याही जातिवंत ग्रंथप्रेमीसारखे फॅडिमन यांनाही जुन्या दुर्मिळ पुस्तकांचे वेड आहे. एकदा फॅडिमन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पती त्यांना जवळच्या एका शहरात एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात ग्रंथखरेदीसाठी घेऊन गेले. त्यावेळी आपण एकोणीस पौंड वजन भरेल एवढी जुनी पुस्तके खरेदी केल्याचे फॅडिमन सांगतात.
पुस्तकात आपण ज्या ठिकाणांचे वर्णन वाचतो तेथे प्रत्यक्ष जाऊन त्या ग्रंथाचे वाचन करणे हाही एक अभूतपूर्व अनुभव असतो. उदा. लेक डिस्ट्रीक्टला जाऊन वर्डस्वर्थ वाचणे किंवा २२,बेकर स्ट्रीट या जगप्रसिद्ध पत्त्यावर जाऊन शरलॉक होम्स वाचणे कोणाला नाही आवडणार ? किंवा कोकणात जाऊन श्री. ना. पेंडशांच्या कादंबऱ्यांची लज्जत अधिकच वाढेल याच्याशी कोण असहमत होईल? फॅडिमन यांनी यू आर देअर या शीर्षकाचा एक सुंदर लेखच या पुस्तकात लिहिला आहे. त्यात त्यांनी पुस्तकात वर्णन केलेल्या ठिकाणी बसून ती ती पुस्तके वाचण्यात काय आनंद आसतो हे सांगितले आहे. कुठलाही जातिवंत ग्रंथप्रेमी ज्याने असा अनुभव घेतला आहे, तो लेखिकेशी असहमत होणार नाही.
अशा अनेक सुंदर किश्श्यांनी व रंजक माहितीने भरलेले हे छोटेखानी पुस्तक पुनःपुन्हा वाचावेसे वाटते. जगभरातल्या ग्रंथप्रेमींनी या पुस्तकावर आपल्या पसंतीची मोहोर उमटविली आहे व आपल्या ग्रंथसंग्रहात या पुस्तकाला मानाचे स्थान दिले आहे.