ग्रंथोपजीवी लोकशिक्षक

Image result for govind talwalkar

गोविंदराव तळवलकर गेले आणि समाजपुरुषाचा एक आधारच हरवला. वयाची एक्क्याण्णव वर्षे त्यांनी पूर्ण केली होती. म्हणजे त्यांचे जाणे अकाली नव्हतेच. पण तरीही घरातलं एक वडिलधारं माणूस गेल्याची भावना महाराष्ट्राची झाली. एक संपादक हा सतत जागता राहणारा व इतरांनाही जागृत ठेवणारा व्रतस्थ प्रहरी असतो. निदान तो तसा असावा अशी अपेक्षा असते. गोविंदराव असेच होते. संपादक म्हणून सतत सत्याची, न्यायाची पाठराखण करण्याचे व्रत तर त्यांनी पाळलेच, पण याहीपलीकडे संपादक हा एक लोकशिक्षकही असतो, लोकांना सतत शिक्षित करण्याचेही कर्तव्य त्याने केले पाहिजे, त्यासाठी स्वतः व्यासंग केला पाहिजे हे स्वतः उमजून तसे त्यांनी केले हे त्यांचे खरे मोठेपण. त्यांचे अफाट व अद्ययावत वाचन, डोळे दिपवणारा ग्रंथसंग्रह व या सर्वाना साजेशी उच्च दर्जाची अभिरुची यात त्यांचे एक लोभस वेगळेपण होते.

मी गोविंदराव तळवलकरांचा एक सामान्य चाहता. महाराष्ट्र टाईम्स चा वाचकही नव्हतो. एक दिवस पुलंच्या ‘आपुलकी’ मधील ‘अग्रलेखक गोविंदराव तळवलकर’ हे व्यक्तिचित्र वाचले आणि अक्षरशः दिपलो. असा व्यासंग, असे वाचन आणि असा अफाट ग्रंथसंग्रह असलेला माणूस आजच्याच काय, कुठल्याही युगात एकूणच दुर्मिळ. मग एक दिवस गोविन्दरावांचे सौरभ खंड -१ हे पुस्तक हाती आले. वाचायला सुरुवात केली आणि अधाशासारखा वाचतच गेलो. इतक्या सोप्या आणि ओघवत्या शैलीत प्रसादासारखा वाटून दिलेला वाचनानंद खूपच सुखावून गेला. लहान मुलाला गोष्टीतले चॉकलेटचे झाड खरोखरच सापडावे व तेही बारमाही फळणारे असावे तसे वाटले. मग गोविंदरावांच्या इतर पुस्तकांचा ऑनलाइन व ऑफलाईन शोध घेणे व ती पुस्तके मागवणे सुरु केले. सौरभ खंड २, वाचता वाचता खंड २, पुष्पांजली खंड २, भारत आणि जग, सत्तांतरचे तिन्ही खंड, बदलता युरोप, बाळ गंगाधर टिळक, वैचारिक व्यासपीठे, मंथन ही सर्व पुस्तके संग्रहात दाखल केली आणि अथपासून इतिपर्यंत वाचून काढली. काही पुस्तके सहज मिळाली तर काही मिळवताना त्रास झाला आणि काही (उदा. वाचता वाचता खंड १, ग्रंथसंगती, पुष्पांजली- खंड १, नौरोजी ते नेहरू ही) पुस्तके उपलब्ध झालीच नाहीत. आवृतीत नसल्यास यांची नवी आवृत्ती त्यांच्या प्रकाशकांनी काढावी अशी गोविंदरावांच्या अनेक चाहत्यांतर्फे माझी आग्रहाची विनंती आहे.

पुस्तकेच नव्हे, तर गोविंदरावांचे वेळोवेळी ललित, मौज, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आदि वृत्तपत्रे व नियतकालिकांमधध्ये येणारे विविध विषयांवरचे लेख वाचायला कधीच चुकत नव्हतो. लोकसत्ता व ललित यांचा मी मुख्यत्वे गोविंदरावांच्या लिखाणासाठीच वर्गणीदार झालो हे सत्य आहे. अगदी या मार्च महिन्याच्या ललित मध्ये सुद्धा ग्लास आर्मोनिका या वाद्याचा इतिहास कथन करणाऱ्या पुस्तकाचा परिचय त्यांनी करून दिला होता. तो लेख वाचल्यावर याही वयात सुरु असलेला त्यांचा व्यासंग बघून थक्कच झालो आणि मनात म्हटले, “परमेश्वरा, हा निर्झर आम्हाला तृप्त करण्यासाठी आणखी खूप वर्षे वाहू दे.” पण तसे व्हायचे नव्हते. अखेर वार्धक्याने कालपुरुषाला शरणागती दिलीच आणि हा ज्ञानयोगी जिथून आला होता तिथे परतला.

संपादक म्हणून गोविंदराव किती थोर होते यावर मी लिहिणार नाही कारण तो माझा अधिकार नाही. पण एक जबरा वाचक व वाचनाचा आनंद भंडाऱ्यासारखा उधळून सर्वांना त्यात रंगवून टाकणारा व्यासंगी लेखक म्हणून त्यांचे गारुड अगदी माझ्या पिढीपर्यंतसुद्धा (म्हणजे जवळजवळ सत्तर वर्षे) कायम होते आणि आहे व पुढेही राहील. काय वाचावे, का वाचावे, कसे वाचावे व वाचून झाले म्हणजे मग पुढे काय करावे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला होता. त्यांच्यासारखेच दुसरे व्यासंगी व ग्रंथवेडे संपादक म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया चे शामलाल. तेही दीर्घायुषी ठरले. ‘सौरभ’ मध्ये शामलाल यांच्या ‘इंडियन रियालिटीज इन बिट्स अँड पीसेस’ या पुस्तकाचा परिचय करून देताना त्यांनी शामलाल यांच्या व्यासंगाचा, ग्रंथप्रेमाचा व त्यांच्यातल्या एका साक्षेपी समीक्षकाचा केलेला गौरव हा स्वतः गोविंदरावांनाही अगदी तंतोतंत लागू पडतो.

शेक्सपिअर हे त्यांचे अक्षय आनंदनिधान होते. गेल्या वर्षी शेक्सपिअर च्या मृत्यूला ४०० वर्षे झाली. त्यानिमित्ताने त्यांनी ‘शेक्सपिअर: एक वेगळा अभ्यास’ व ‘शेक्सपिअर: जगाचा नागरिक’ हे दोन उत्कृष्ट लेख क्रमशः ललित व लोकसत्ता मध्ये लिहीले. गेल्या दिवाळीतही मौज व लोकसत्ता च्या दिवाळी अंकांत नेताजींच्या मृत्यूबद्दल व दुस-या महायुद्धात जपान्यांनी केलेल्या राक्षसी अत्याचारांबद्दल त्यांनी लिहिले होते. मला स्वतःला त्यांचे ‘वैचारिक व्यासपीठे’ हे पुस्तक फार फार आवडते. कारण माझ्या मते जगभरातील उत्तमोत्तम व समृद्ध अशा नियतकालीकांचा परिचय करुन देणारे मराठीत तरी हे एकमेव पुस्तक आहे आणि हा परिचय करून देण्याचा अधिकारही गोविन्दरावांनाच होता; नव्हे तो त्यांनी कमावला होता. साम्यवादी इतिहास व विचारधारा यांचा इतका साक्षेपी अभ्यास मराठी तर सोडाच पण इतर भाषांतही क्वचितच केलेला आढळेल. हा विचार एकीकडे करत असतानाच एक रसिक म्हणून सोवियत साम्यवादाचा जनक लेनिन कसा होता हेही गोविंदराव तमारा डॉयश्चर या लेखिकेच्या ‘द अदर लेनिन’ या पुस्तकाच्या आधारे आपल्याला दाखवून द्यायला विसरत नाहीत. इतका सूक्ष्म व्यासंग किती लोक करू शकतात?

‘दिसामाजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ हा समर्थांचा उपदेश आयुष्यभर कसोशीने आचरणात आणणा-या मोजक्या विद्वानांत गोविंदराव होते. ज्यांना ख-या अर्थाने पब्लिक इंटेलेक्चुअल म्हणावे असा हा लोकशिक्षक, समाजमन निकोप ठेवण्यासाठी झटणारा निर्भीड प्रहरी या जगाला खूप हवा असतानाच निघून गेला आहे याचेच वैषम्य वाटते. पण मर्त्य शरीराला आयुष्याच्या मर्यादा असतातच. त्याला इलाज नसतो. आपल्याला गोविंदराव लाभले हे आपले भाग्य. असा व्यासंगी आता होणे नाही. त्यांच्या आवडत्या शेक्सपिअरचे हे शब्द त्यांना तंतोतंत लागू पडतात:

He was a man, take him all in all
We shall not look upon his like again