‘हिंदू’ ची दशकपूर्ती …

hindu_novel‘हिंदू’ ही नेमाड्यांची magnum opus आहे, हे निश्चित. ‘कोसला’ पासून चालत आलेला त्यांच्या लेखनाचा प्रवाह ‘हिंदू’ मध्ये विशाल रूप धारण करतो. या कादंबरीच्या प्रकाशनाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ ने नुकतीच एक चर्चा घडवून आणली. त्यात अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली.

मुळात नेमाड्यांच्या या कादंबरीकडून वाचकांच्या अपेक्षाच फार होत्या / आहेत असे आजही या चर्चेतून स्पष्ट होते. हेच या कादंबरीचे यश म्हणता येईल. ‘हिंदू’ हा शब्दच मुळात भारतीयांसाठी आणि भारताच्या अभ्यासकांसाठी अत्यंत संवेदनशील. त्यात या कादंबरीचे शीर्षक अत्यंत तिरपागडे- ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’.  आता या शीर्षकातला ‘हिंदू’  शब्द नेमके काय सुचवतो ? हिंदू धर्म ? की हिंदू संस्कृती ? हिंदू समाज की हिंदुत्व ही राजकीय विचारधारा ? की एकंदरीत सर्वच ? यापैकी नेमके कशाला ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हटले आहे ?

मला वाटते या शीर्षकातील ‘हिंदू’ या शब्दावरून नेमाड्यांना ‘हिंदू’ ही  आयडेंटिटी, ही ओळख, अपेक्षित आहे. ही ओळख एका विशिष्ट सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेतून तयार होते. नेमाडे तिलाच ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हणतात. Continue reading

गूगल माझा गुरु

[विचारवेध, पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला माझा निबंध].

भगवान दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले होते. चराचर सृष्टीतील आणि अनेक प्राणीमात्रांना त्यांनी गुरुस्थान दिले, कारण त्यातल्या प्रत्येकापासून दत्तात्रेयांना कुठलातरी बोध झाला किंवा ज्ञान मिळाले. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गूगल हा जगद्गुरु बनला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लहानपणी आपल्या सर्वांना हवे ते दाखवणाऱ्या व हवी ती माहिती देणाऱ्या जादूच्या आरशाची गोष्ट सांगितली जायची. गूगलच्या रुपाने हा जादूचा आरसा प्रत्यक्षात अवतरला आहे असेच म्हणायला हवे. आज गूगलने आपल्या सर्वांच्या आयुष्यात या ना त्या कारणाने, या ना त्या प्रकारे प्रवेश केला आहे. अँड्रॉइड फोन्स मुळे तर गूगल सर्वव्यापी झाला आहे. सर्जेई ब्रिन व लॅरी पेज या दोन तरुणांनी २७ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल या सर्च इंजिनची सुरुवात केली. ‘गूगोल’ या शब्दाशी जवळीक दाखविणारा ‘गूगल’ हा शब्द त्यांनी निवडला, कारण गूगोल या संज्ञेचा अर्थ दहाचा शंभरावा घातांक (१०१००) असा होतो. सुरुवातीला केवळ सर्च इंजिन असलेल्या गूगलने आपल्या दोन दशकांच्या वाटचालीत आता ईमेल, क्लाऊड कम्प्युटिंग, मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम, यासारख्या असंख्य विस्तृत सेवांच्या महाकाय जालाचे स्वरूप धारण केले आहे. आजच्या गूगलला तर ‘स्थिरचर व्यापून दशांगुळे उरणाऱ्या’ जगदात्म्याचीच उपमा शोभेल. Continue reading