कल्पतरूंचे आरव …

आज २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. भाषाप्रभू शेक्सपिअरची जयंती व पुण्यतिथी दोन्ही. त्याच्याच गौरवार्थ/ स्मरणार्थ आजचा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

माणसांनी पुस्तके निर्माण केली आणि पुस्तकांनीही माणसे घडविली. माणूस आणि पुस्तके यांच्यात असे एक रम्य अद्वैत आहे. पुस्तकांनी माणसाला काय दिले नाही? ज्ञान तर दिलेच, पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या जीवाला दिलासा दिला, त्याला विरंगुळा दिला, त्याच्या जखमांवर फुंकर घातली, तर कधी निराश मनाला उभारी दिली. सृजन ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. त्याला सतत व्यक्त व्हावेसे वाटते. सर्जनातूनच तो व्यक्त होतो. ‘मुझे कुछ कहना है’-  मला काही सांगायचंय – या सनातन उर्मीतून अभिव्यक्ती येते. मग कुणी कुठल्या तर कुणी कुठल्या माध्यमातून व्यक्त होतो. कुणी गातो, कुणी चित्रे काढतो, कुणी कविता करतो, कुणी कथा-कादंबऱ्या लिहितो, कुणी व्याख्यान देतो तर कुणी नुसते  गप्पांचे फडच रंगवतो. कितीतरी तऱ्हा अभिव्यक्तीच्या ! अगदी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढणाऱ्या गृहिणीलासुद्धा त्यातून काही सांगायचे असते. Continue reading

कशी मिळवावीत चांगली पुस्तके? हे वाचा …

ग्रंथसंग्रह कसा व कुठून करावा, नव्या जुन्या पुस्तकांची माहिती कुठून मिळवावी यासाठी काही संपर्कस्थानांची माहिती सर्वांकरीता खाली देत आहे. ही माहिती परिपूर्ण अर्थातच नाही. पण सुरुवात करता येईल अशी मात्र आहे.

ऑनलाईन बुकस्टोअर्स

  • हिंदी पुस्तकांसाठी:
    1. भारतीय ज्ञानपीठ – jnanpith.net
    2. in
    3. Gita Press, Gorakhpur
  • संस्कृत पुस्तकांसाठी:
    1. मोतीलाल बनारसीदास – mlbd.in
    2. Exotic India – exoticindia.com/book

पुस्तकांशी संबंधित ब्लॉग्ज, फेसबुक ग्रुप, पेजेस इत्यादी

  • पुस्तक बिस्तक (FB Group)
  • दुर्मिळ पुस्तके (FB Group)
  • राजहंस, मेहता, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, Majestic, पॉप्युलर रोहन या प्रकाशनांचे फेसबुक पेजेस व वेबसाईट

पुस्तकांशी संबंधित नियतकालिके, पुस्तक परीक्षणे देणारी नियतकालिके इत्यादी :

  • इंग्रजी:
    1. Biblio- A Review of Books https://www.biblio-india.org/
    2. Times Literary Supplement
    3. London Review of Books
    4. New York Times Book Review
    5. New York Review of Books
    6. Kirkus Review
  • मराठी:
    1. ललित मासिक – Majestic Prakashan
    2. आपले वाङ्मयवृत्त – लोकवाङ्मय गृह प्रकाशन
    3. रोहन साहित्य मैफल
    4. मेहता मराठी ग्रंथजगत
    5. राजहंस बुक क्लब व त्याचे मासिक
  • हिंदी : ज्ञानपीठ समाचार
  • संस्कृत: MLBD Newsletter (Motilal Banarasidas)

Wear the old coat and buy a new book- Austin Phelps

हवीहवीशी पुस्तके :विस्मृतीत गेलेल्या काही पुस्तकांबद्दल थोडेसे…

Image result for booksवाचनाचा आवाका जसाजसा वाढतो, तसातसा अनेक पुस्तकांसोबत परिचय होतो. काहींशी गाढ मैत्री होते, काही जुन्या नव्या पुस्तकांबद्दल माहिती मिळत जाते आणि वाचनानंद वर्धिष्णू होत जातो.

काही जुन्या पुस्तकांबद्दल माहिती मिळते, त्यांना वाचायची इच्छासुद्धा होते, पण अनेकदा ती पुस्तके दुर्मिळ झालेली असतात किंवा अनुपलब्ध असतात. अशा वेळी त्यांच्याबद्दल वाटणारी ओढ अधिकच वाढते. त्यांना काहीही करून मिळवायची इच्छा होते. मग मी वळतो इंटरनेट कडे. अनेकदा अशी पुस्तके कुठल्यातरी ऑनलाइन अभिलेखागारात अथवा गूगल बुक्स सारख्या संकेत स्थळावर ई-बुकच्या स्वरुपात आढळतात. कधीकधी जुनी पुस्तके विकणाऱ्या ऑनलाइन बुकस्टोअर मध्ये सापडतात तर कधी कुठल्या तरी ग्रंथालयात किंवा जुनी पुस्तके विकणारांकडे सापडतात. मात्र अनेकदा कुठेच सापडत नाहीत. हवे असलेले दुर्मिळ पुस्तक सापडल्यावर होणारा आनंद वेगळाच. मात्र अशा वेळी या पुस्तकाची आवृत्ती आज प्रकाशनात हवी होती असे वाटल्यावाचून राहत नाही.

आज मी अशाच काही मराठी व इंग्रजी पुस्तकांबद्दल लिहीणार आहे, जी आज फक्त ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत किंवा मुळीच उपलब्ध नाहीत, पण ज्ञानाच्या क्षेत्रात ज्यांचे मोल आहे आणि त्यांची आवृत्ती प्रकाशनात असणे माझ्या व माझ्यानंतरच्या पिढयांसाठी उपकारक आहे.

मी आयुष्यात वाचलेले पहिले गंभीर (व मोठे) पुस्तक म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित कथनमाला. पाचव्या वर्गाची परीक्षा पास झाल्यानंतर बाबांचे कपाट धुंडाळतांना हे पुस्तक अवचित हाती लागले अन मग त्याने मनाचा ताबा कधी घेतला हे काही कळलेच नाही. पत्रकार गजानन खोले यांनी संकलित केलेले बाबासाहेबांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानांचे हे पुस्तक पुण्याच्या इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. पुढे राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांनी लिहिलेले चरित्र वाचण्याचाही योग आला. पण कथनमालेत त्यामानाने अधिक तपशील होते व ते अधिक रंजकही होते. मला आठवते, कवी भूषणाचे पूर्वायुष्य, त्याचा त्याच्या वहिनीशी स्वयंपाकातील मिठावरून झालेला वाद व पुढे भूषणाच्या प्रसिद्धी मिळविण्याची कथा- या सगळ्या व अशांसारख्या अनेक रंजक तपशीलांनी शिवचरित कथनमाला भरलेली आहे. आज हे पुस्तक माझ्याजवळ नाही. खूप धुंडाळले. इंटरनेट वर शोधले. प्रकाशकांकडेही चौकशी केली, पण गेली अनेक वर्षे हे पुस्तक आवृत्तीत नसल्यांचे कळते. आता काही ग्रंथालयात त्याचा जुन्या प्रती शिल्लक आहेत, तेवढ्याच.

हे पुस्तक प्रकाशनात असावे असे प्रकर्षाने वाटते. यावर वाचकांच्या उड्या पडतील हे मात्र निश्चित. इंद्रायणी साहित्त्य प्रकाशनानेच हे कार्य शक्य तितक्या लवकर करावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.

१८५७ ची शिपाई गर्दी हे आज प्रा. नरहर रघुनाथ फाटक यांचे पुस्तकही अत्यंत दुर्मिळ झालेल्या पुस्तकांच्या श्रेणीत येते. १९५७ साली १८५७ च्या उठावाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची वेगळी मीमांसा करणारे प्रा. फाटकांचे हे पुस्तक आहे. १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यसमर नसून केवळ शिपाईगर्दी होती असे या पुस्तकातील फाटकांचे मत अत्यंत वादग्रस्त ठरले. कठोर वैचारिक शिस्तीचा, भरपूर पुराव्यांनिशी विषयांची मांडणी करणारा नामूलं लिख्यते किंचित हे व्रत कसोशीने पाळणारा अभ्यासक म्हणून प्रा. फाटक प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या पुस्तकाने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली. आचार्य अत्र्यांनी तर फाटकांविरुद्ध आघाडीच उघडली. चित्रशाळा प्रेसने १९५७ साली प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची प्रत मलातरी आज कुठेही आढळली नाही. ई-बुक स्वरुपात तर राहोच पण मी DELNET, Digital Library of India अशा ग्रंथालयाच्या जालांमध्येही शोध घेतला. पण कुठल्या ग्रंथालयामध्येही हे पुस्तक आढळले नाही.

मला या पुस्तकाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. फाटकांनी आपल्या मताच्या समर्थनार्थ काय पुरावे दिले असतील व कसा युक्तिवाद केला असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. २००७ साली १८५७ च्या उठावाला दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी सुद्धा या पुस्तकाची आवृत्ती निघाली नाही. आतातरी कुठल्यातरी प्रकाशकाने या पुस्तकाची आवृत्ती काढून एक महत्वपूर्ण पुस्तक विस्मृतीत जाण्यापासून वाचवावे. फटकांशी स्नेहबंध असलेले मुंबई मराठी साहित्य संघ हे करेल काय ?

सेतुमाधवराव पगडी यांचे इतिहास आणि कल्पित हे असेच एक दुर्मिळ झालेले अप्रतिम पुस्तक. ललित साहित्यातून अनेकदा चुकीचा इतिहास मांडला जातो. साहित्यिक कधी कधी अवाजवी स्वातंत्र्य घेतात. सेतुमाधवरावांनी आपल्या नर्म विनोदी, खुसखुशीत शैलीत अनेक ललित साहित्यकृतींचा परामर्श घेऊन खरा इतिहास कथन करीत सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर घातली आहे. ललित साहित्यात संभाजी महाराजांवर झालेला अन्याय, राणी पद्मिनीची कहाणी व त्या मागचे सत्य, घाशीराम कोतवाल प्रकरण या व अशांसारख्या अनेक बाबींवर सप्रमाण असा प्रकाश पगडींनी टाकला आहे. या शिवाय इतिहास संशोधन करतांना आलेले मजेदार अनुभव तसेच इतरही काही मनोरंजक स्फुट लेख या संग्रहात आहेत. माझ्या वडिलांच्या महाविद्यालयातील ग्रंथालयातून आणलेले हे पुस्तक मी दोनदा वाचले आहे. शेवटचे २००४ साली वाचले. त्याची अवीट गोडी अजून स्मरते. आज हे पुस्तक प्रकाशनात नाही. अलिकडे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या समग्र सेतुमाधवराव पगडी च्या खंडांमध्ये हे पुस्तक आहे. पण त्याची स्वतंत्र आवृत्ती निघणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.

Continue reading

पुन्हा एकदा अत्रे, पु. ल., कुसुमाग्रज …

आचार्य अत्रे, पु ल देशपांडे व कुसुमाग्रज म्हणजे गेल्या ६० वर्षाहूनही अधिक काळ मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे तीन जबरदस्त प्रतिभावंत. महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक इतिहासाला ज्यांच्याशिवाय पूर्णताच येणार नाही असे तीन थोर सरस्वतीपुत्र. ज्यांच्या साहित्याची मोहिनी, ज्यांचे गारुड आजही मराठी मनावर कायम आहे आणि कितीही वाचले तरीही ज्यांच्या साहित्याची गोडी कायमच अवीट राहिली आहे, असे हे थोर कलोपासक, रसिकाग्रणी. या तिघांपैकी आज कोणीही हयात नाही. मात्र अर्धशतकाहूनही अधिक काळ त्यांच्या साहित्याची मोहिनी महाराष्ट्रमनावर कायम आहे.या तिघांबद्दल परचुरे प्रकाशन मंदिराने नुकतीच तीन छान पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘अप्रकाशित आचार्य अत्रे’, ‘पुन्हा मी, पुन्हा मी’ व ‘सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज’ ही ती तीन पुस्तके. यापैकी अप्रकाशित आचार्य अत्रे  हा अत्रेंच्या आजवर अप्रकाशित राहिलेल्या साहित्याचा संग्रह आहे. तसेच पुन्हा मी, पुन्हा मी हा पुलंच्या अप्रकाशित साहित्याचा संग्रह आहे तर सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज हा विविध मान्यवर साहित्यिक व समीक्षकानी कुसुमाग्रजांच्या हयातीत तसेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे.

पुलंना जाऊन त्यामानाने फार काळ लोटलेला नाही. त्यामुळे त्यांचे बरेच अप्रकाशित साहित्य प्रकाशित होत आहे. कदाचित आणखीही होईल. पुन्हा मी, पुन्हा मी या संग्रहापूर्वीही परचुरे प्रकाशन मंदिराने ‘गाठोडे’ व ‘पाचामुखी’ ही पुलंच्या अप्रकाशित साहित्याची दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत व ती सहज उपलब्ध आहेत. पुन्हा मी, पुन्हा मी हे या मालिकेतले तिसरे पुस्तक म्हणता येईल. २७ फेब्रुवारी २०१५ ला हे पुस्तक प्रकाशित झाले. मुखपृष्ठ व आतील व्यंगचित्रे अनेक वर्षांपासून पुलंची पुस्तके सजविणारे सिद्धहस्त व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची आहेत. त्यामुळे पुस्तक जणू पुलंच्या हयातीतच प्रकाशित झाले असावे असे वाटते. मात्र या संग्रहातील ‘एक हरपलेले प्रेय’ या कवितेतील रेखाटने ही श्रीराम बोकील यांची आहेत. या संग्रहात आजवर अप्रकाशित राहिलेले पुलंचे विनोदी व वैचारिक लेख, (विनोदी) कथा व कविता, व्यक्तीचित्रणे, प्रासंगिक लिखाण, तसेच काही भाषणे, मुलाखती व क्वचित एखादे पत्रही आहे. यातील काही साहित्य हे पुलंनी आपल्या उमेदवारीच्या काळात, म्हणजे १९४५-६० च्या दरम्यान लिहिलेले आहे. ‘सत्यकथा’, ‘साधना’, ‘अभिरुची’ यांसारख्या दर्जेदार व त्याकाळी लोकप्रिय असलेल्या नियतकालिकांमधून या लिखाणाला पूर्वप्रसिद्धी लाभलेली आहे. या संग्रहातील पुलंचे परमस्नेही श्री वसंत सबनीस यांनी घेतलेली पुलंची खुमासदार मुलाखत (सबनीस पुसे, देशपांडे सांगे) व श्री अरविंद औंधे यांनी घेतलेली काहीशी सिरीयस मुलाखत (माझ्या आयुष्यात फ्लूक्स वारंवार आले) या दोन्ही मुलाखतींतून पुलंचा हजरजबाबीपणा तसेच एक कलाकार व रसिक म्हणून त्यांचे स्वतःबद्दलचे स्वतःच्या साहित्यनिर्मितीबद्दलचे व एकूणच कलेबद्दलचे अत्यंत सुंदर व मूलगामी चिंतन आपल्याला दिसून येते. व्यक्तीचित्रणे लिहिण्यात पुलंचा हातखंडा. याही पुस्तकात पुलंनी त्यांना गुरुस्थानी असलेल्या मो. ग. रांगणेकरांचे सुंदर व्यक्तिचित्र रेखाटले आहे. दुसरे व्यक्तिचित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे आहे. बाबासाहेबांचे ‘गणगोत’ मध्ये पुलंनी लिहिलेले व्यक्तिचित्र तर सुप्रसिद्ध आहेच पण प्रस्तुत संग्रहातील “शिवरंगी रंगलेले बाबासाहेब पुरंदरे” हे तरुण भारत च्या बाबासाहेब पुरंदरे गौरव विशेषांकासाठी लिहिलेले व्यक्तिचित्रही अत्यंत वाचनीय झाले आहे. गणगोत वाचलेल्यांनासुद्धा अनेक वर्षानी लिहिलेले हे व्यक्तिचित्र तितकेच ताजे व वाचनीय वाटेल. विविध प्रसंगी पुलंनी केलेली तीन भाषणेही या संग्रहात आहेत. त्यातील ‘चंदनाचे हात, पायही चंदन’ हे साने गुरुजींवर केलेले भाषण गहिवर आणणारे आहे. गुरुजींच्या महत्तेचे अचूक शब्दांत व अत्यंत आत्मीयतेने केलेले हे वर्णन आहे. एकंदरीतच पुलंच्या अप्रकाशित साहित्याचे हे संकलन म्हणजे कथा, कविता, विनोदी लेख, व्यक्तिचित्रण, नाटिका, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत पु. ल. नावाच्या बहुरूपी खेळीयाने केलेल्या मनस्वी मुशाफिरीचे दर्शन घडवते. पु. लं. म्हणजे निखळ, निर्भेळ आणि अभिरुचीसंपन्न जीवनानंद, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना सदोदित येतो आणि का कोण जाणे, पण पुलंचे आणखी अप्रकाशित वाङमय लवकर प्रसिद्ध व्हावे अशी ओढ वाटते. लहान मूल जसे आपले चॉकलेट पुरवून पुरवून खाते तसेच हे पुस्तकही आपण पुरवून पुरवून वाचावे- नव्हे पुलंचा प्रसन्न सहवास संपूच नये असे वाटत राहते.

Continue reading