प्रज्ञावंताच्या सहवासात…

sangatनरहर कुरुंदकरांनी महाराष्ट्राला विचार करायला शिकवले. हा असामान्य प्रतिभावंत, प्रज्ञावंत महाराष्ट्राच्या वैचारिक क्षितिजावर जवळजवळ पस्तीस वर्षे तेजाने तळपला आणि अकाली अस्ताला गेला. साहित्य, कला, राजकारण, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये सहज व अव्याहत संचार करणारी मूलगामी चिकित्सक बुद्धी नरहर कुरुंदकरांना लाभली होती. कोणताच विषय त्यांना वर्ज्य नव्हता. त्यांच्या बुद्धिमत्तेची कक्षा स्तिमित करणारी आहे.

कुरुंदकर गुरुजींचे विचारधन त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेच, पण गेल्या काही वर्षात कुरुंदकरांचे काही अप्रकाशित लिखाणसुद्धा प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. कुरुंदकर यांचे चिरंजीव विश्वास कुरुंदकर यांनी ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या शीर्षकाची एक ग्रंथमाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे या ग्रंथ माले तले ‘निवडक नरहर कुरुंदकर : व्यक्तिवेध’ तसेच ‘ग्रंथवेध भाग १ व २’ हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातच नरहर कुरुंदकरांचे मित्र व सहाध्यायी मधु कुरुंदकर यांनी लिहिलेल्या ‘संगत नरहरची’ या दुर्मिळ झालेल्या ग्रंथाच्या नव्या आवृत्तीची भर पडली आहे. ‘संगत नरहरची’ हे पुस्तक मधु कुरुंदकरांनी सर्वप्रथम १९९४ मध्ये लिहिले व ते संगत प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केले. त्यानंतर २००३ साली या पुस्तकाची वाढीव व सुधारित अशी दुसरी आवृत्ती स्वतः लेखकानेच सत्संगत प्रकाशन या स्वतःच्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित केली. ही आवृत्ती संपून बरीच वर्षे झाली होती व हे पुस्तक दुर्मिळ झाले होते. तसेही प्रकाशनात असतानासुद्धा ते बृहन्महाराष्ट्रातील सर्व कुरुंदकरप्रेमींपर्यंत पर्यंत पोचू शकले नव्हते. आता मात्र साधना प्रकाशनाने या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

पहिल्या आवृत्तीला प्राचार्य राम शेवाळकर यांनी लिहिलेली प्रस्तावना याही आवृत्तीत आहे. प्रस्तावनेमध्ये प्राचार्य शेवाळकरांनी या पुस्तकातील अनेक आठवणी आपल्यालाही आधी ज्ञात असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुस्तकाची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे. मधु कुरुंदकर हे नरहर कुरुंदकरांचे आप्त तसेच सहाध्यायी व मित्र. बालपणापासून दोघे सोबत खेळले, वाढले. मॅट्रिकच्या अभ्यासासाठी म्हणून मधु कुरुंदकर यांना नरहर कुरुंदकरांसोबत हैदराबाद येथे शिकण्याचा व राहण्याचा योग आला. इथून पुढे जवळजवळ शिक्षण पूर्ण होईपर्यंत दोघे सोबत होते. एक विद्वान, विचारवंत व प्रतिभावंत म्हणून नरहर कुरुंदकर कसे घडत गेले याचे मधु कुरुंदकर हे जवळचे साक्षीदार होते. त्यामुळे नरहर कुरुंदकरांना समजून घेण्यासाठी मधु कुरुंदकरांच्या या आठवणी फार मोलाच्या आहेत. मराठवाड्यात वसमत जवळचे कुरुंदे हे दोघांचेही मूळ गाव. उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघा मित्रांच्या भेटी होत. दोघेही समवयस्क होते. इतर समवयस्क मित्रांच्या संगतीत खेळ व गप्पांना उधाण येई. लहानपणापासूनच नरहरीला वक्तृत्वाचे व अभ्यासाचे देणे लाभले होते. अनेकविध विषयांवर नरहरी चे मजेदार मूलगामी प्रगल्भ विवेचन (किंबहुना रसाळ निरुपण) सतत सुरू असे. ते ऐकताना समवयस्क मित्रच नव्हे तर गावातले वडीलधारे सुद्धा गुंग होऊन जात. पुढे मधु कुरुंदकर मॅट्रिकची परीक्षा नापास झाले त्यावेळी नरहर कुरुंदकर हेही मॅट्रिकची परीक्षा नापास झाले होते. नरहर कुरुंदकर हैदराबादला आपले मामा डॉक्टर नारायणराव नांदापूरकर यांच्याकडे शिकायला होते. त्यांनी आग्रह करून आपल्याबरोबर मधु कुरुंदकरांनाही हैदराबादला शिकायला नेले व इथूनच दोघांचे अगदी घनिष्ठ साहचर्य सुरू झाले.

हैदराबादला सिटी कॉलेजमध्ये शिकत असताना नरहरीचे चौफेर वाचन व व्यासंग सुरू होता. अभ्यासाकडे त्याचे फारसे लक्ष नसे. सतत व्यासंग, विद्वानांचा संग व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा यातून नरहर कुरुंदकरांमधला विद्वान घडत गेला. अगदी लहान वयापासूनच नरहर कुरुंदकर किती अफाट वाचन आणि व्यासंग करीत व मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा कसे प्रभावित व चकित करीत याचे अनेक किस्से मधु कुरुंदकरांनी या पुस्तकात सांगितले आहेत. मुळातच कुशाग्र असलेल्या नरहर कुरुंदकरांच्या बुद्धीला पैलू पाडण्याचे व त्यांच्या व्यासंगाला दिशा देण्याचे काम कुरुंदकर यांचे मामा डॉक्टर नांदापूरकर तसेच मराठीतले नामांकित विद्वान प्राध्यापक भालचंद्र महाराज कहाळेकर यांनी केले. हैदराबादच्या सिटी कॉलेजचे ग्रंथालय, आंध्र स्टेट लायब्ररी यासारख्या ग्रंथालयात मधल्या तसेच आपल्या मामांच्या ग्रंथसंग्रहातल्या मोठमोठ्या भक्कम ग्रंथांचा अगदी कमी वयात नरहर कुरुंदकरांनी फडशा पाडला होता. इंटरच्या वर्गापासून मात्र दोघा मित्रांचे मार्ग वेगळे झाले. मधु कुरुंदकर हे औरंगाबादला शिकायला गेले तर नरहर कुरुंदकर हैदराबादलाच शिकत राहिले. इथून दोघा मित्रांमध्ये काहीसा औपचारिक दुरावा आला, पण अंतरीची ओल मात्र कायम राहिली. पुढे नोकरीच्या निमित्ताने मधु कुरंदकर नांदेडला आले व एका खाजगी शाळेत शिक्षकाची तात्पुरती नोकरी करू लागले. त्यांनी ही नोकरी सोडल्यावर याच जागेवर नरहर कुरुंदकर यांची नेमणूक झाली. अशाप्रकारे दोघा मित्रांनी नांदेड येथेच आपापले संसार थाटले. नरहर कुरुंदकर पुढे पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्य झाले आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षितिजावर तेजाने तळपू लागले. तरीही आपल्या मैत्रीला ते ससतत जागले. पूर्वीइतकी सलगी आता शक्य नसली तरी दोघे मित्र एकमेकांना प्रेम व आधार देत असत.

वक्ते व विद्वान म्हणून नरहर कुरुंदकर यांची ख्याती कशी पसरत गेली यासंबंधी अनेक रम्य आठवणी मधु कुरुंदकर यांनी सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे एक तत्वनिष्ठ विचारवंत तसेच विद्यार्थीप्रिय व कर्तव्यदक्ष प्राध्यापक व प्राचार्य म्हणून नरहर कुरुंदकरांचे आचरण किती काटेकोर असे यासंबंधीही अनेक आठवणी यात आहेत. नरहर कुरुंदकरांच्या कर्तबगारीचा आलेख असा चढत जात असतानाच वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी व्यासपीठावरच औरंगाबाद येथे हृदयविकाराच्या आकस्मिक झटक्याने त्यांचे निधन झाले. आपल्या मित्राच्या निधनाचे मधु कुरुंदकरांनी केलेले वर्णन अतिशय चटका लावणारे आहे. ते वाचताना आपल्यालाही गहिवरून येते.

पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात नरहर कुरुंदकर यांच्या काही स्फुट आठवणी सुद्धा लेखकाने दिल्या आहेत. मधु कुरुंदकर हे स्वतः कवी व ललित लेखक होते किंबहुना छापून येणारे पहिले कुरुंदकर तेच. त्यांची भाषा ओघवती आहे. आपल्या मित्रा बद्दलचा भावनिक ओलावा त्यांच्या लिखाणात पदोपदी जाणवतो. त्याच्या आठवणींनी मिळणाऱ्या स्मरणसौख्यात आपल्यालाही सहभागी करून घेण्यात लेखक यशस्वी झाला आहे. या ग्रंथाच्या पुन: प्रकाशनाच्या निमित्ताने नरहर कुरुंदकर नावाच्या थोर प्रज्ञावंतांचे पुण्यस्मरण महाराष्ट्राला घडेल व कुरुंदकरांच्या विचारधनाचा परिशीलनाला नव्याने चालना मिळेल यात शंका नाही.

संगत नरहरची  – मधु कुरुंदकर , साधना प्रकाशन, पुणे  (मूल्य २०० रुपये. )