धर्माने मला काय दिले?

आज साधना साप्ताहिकाचा अंक हाती आला. या अंकात धर्माने मला काय दिले? या विषयावर काही मान्यवर विचारवंतांची चर्चा साधनाने घडवून आणली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी जोपासलेल्या उद्दिष्टांपैकी कालसुसंगत धर्मचिकित्सा हेही एक उद्दिष्ट होते. त्याला अनुसरूनच साधनाने या अंकाची ही बीजकल्पना ठेवली आहे. ही थीम मला भावली. प्रश्न आवडला. खरंच धर्माने मला काय दिले? मलाही या विषयावर प्रकट चिंतन करावेसे वाटले. म्हणून ही लेखनकामाठी.

मी हिंदू. हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलो म्हणून हिंदू. अगदीच सनातनी नव्हे, पण समृद्ध आणि पापभीरु अशा एका मोठ्या संयुक्त हिंदू कुटुंबात जन्मलो. कोणाचेही वाईट चिंतू नये, करू नये, निर्व्यसनी रहावे, उत्तम चारित्र्य जोपासावे, मन लावून शिकावे आणि इभ्रतीला सदैव जपून असावे हे संस्कार लहानपणापासून मनावर झाले. परमेश्वर आहे. पापाला शिक्षा असते. पुण्याला मान असतो. पुण्याचे, सत्कर्माचे चांगले फळ मिळते, हे मनावर ठसले. घरात व्रतवैकल्ये, सणवार नियमित साजरे होत. माझी आत्या घरात सर्वात जेष्ठ. भावंडांना शिकता यावे, मोठे होता यावे, म्हणून ती आजन्म अविवाहित राहिली व कुटुंबाला तिनेच ऊर्जितावस्थेत आणले. दररोज सकाळी पाच वाजता सडा-संमार्जन, देवपूजा आज ऐंशीव्या वर्षी सुद्धा ती नियमित करते. गौरी, गणपती, चैत्र व आश्विनातले नवरात्र इत्यादी सर्व सण यथासांग साजरे होतात ते आत्याच्याच पुढाकाराने व परिश्रमांनी. माझा जन्म व्हायचा होता, तेव्हा होणाऱ्या बाळावर (म्हणजे अस्मादिकांवर) चांगले संस्कार व्हावेत म्हणून श्रावणात रामविजयाची पोथी लावण्याचा क्रम सुरू झाला व तो पुढे दहा-अकरा वर्षे सुरू राहिला. वडील व तिन्ही काकांसहित सर्वजण धार्मिक. सूर्याला अर्घ्य व तुळशीला तांब्याभर पाणी अर्पण करण्याचा क्रम या सर्वांनी आयुष्यभर पाळला. या वातावरणामुळे धर्मावर श्रद्धा बसली व मी ही धार्मिक झालो. रामायण, महाभारत, श्रीमद् भागवत, हरिविजय हे ग्रंथ ऐकले, वाचले. एका थोर व उदात्त मूल्यपरंपरेचे आपण पाईक आहोत हे त्यातून जाणवले. ‘परोपकार पुण्याय, पापाय परपीडनम्’(परोपकार हे पुण्य तर परपीडा म्हणजे पाप), हे धर्माचे सार आहे याची खात्री पटली. मर्यादशील असण्यात जीवनाचे सार्थक आहे. काही झाले तरी सर्व बाबतीत मर्यादा पाळावी हे रामायणाने शिकवले. ‘न भीतो मरणादस्मि, केवलं दूषितो यशः’ (मी मृत्यूला नव्हे, तर केवळ अपकीर्तीला भितो)  असे म्हणणारा राम, ‘नहीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण’ (अधर्माने मिळत असेल तर मला इंद्रपदही नको) असे म्हणणारा राम, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ (माता आणि मातृभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत) असे म्हणणारा राम व या सर्व उक्ती आचरणात आणणारा राम धर्मग्रंथातच भेटला. स्वाभिमान, शील, कर्तव्यपरायणता, निस्वार्थ सेवा, वचनाचे पालन- ही मूल्ये धर्मानेच दिली. कालौघात दोन मोठे आघात परिवारावर झाले. व्यावहारिक संकटे तर आणिक आली. पण कोणीतरी लाज राखणारा आहे, ही अनुभूतीही आली- नव्हे, येत असते.

अजूनही धर्म कळला असे म्हणण्याचे धाडस होत नाही. पण धर्माला धरून राहावे, ‘न त्यजेत् धर्मं जीवितस्यापि हेतोः’ (अगदी जीवितासाठी सुद्धा धर्माचा त्याग करू नये) असे सतत वाटते. सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहेत. सर्वांचे कल्याण चिंतावे व सर्वांच्या कल्याणासाठी धर्म आचरावा हे धर्मानेच शिकविले आणि म्हणूनच दोन्ही हात वर करून सांगणाऱ्या व्यासांप्रमाणे- धर्मादर्थश्च कामश्च, स किमर्थम् न सेव्यते? (धर्मामुळे अर्थ आणि काम (हे पुरुषार्थ) आहेत, मग धर्माचे पालन का करत नाही?) हा साधा प्रश्न सदैव पडत राहतो. उत्तर काही मिळत नाही.