नुकतेच ओम स्वामी यांचे When All is Not Well: Depression, Sadness and Healing: A Yogic Perspective हे पुस्तक वाचून संपवले. ओम स्वामी हे एक संन्यासी आहेत. संन्यास घेण्यापूर्वी ते एका मोठ्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीचे मालक होते. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी हिमालयाच्या कुशीत आपला एक आश्रम स्थापित केला व सध्या ते तिथेच वास्तव्यास आहेत. मुळात ते उच्चशिक्षित आहेत. लोकांना ते ध्यान, साधना याविषयी तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांविषयीदेखील मार्गदर्शन करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील प्रमुख ही ध्यानधारणा, निरामय जीवन, नैराश्य व त्यावरील उपाय, मंत्रांची शक्ती, गायत्री मंत्र या व अशा विषयांवर आहेत. When All is Not Well, The Wellness Sense, The Power of Gayatri Mantra, A Million Thoughts, The Ancient Science of Mantras ही त्यांची काही पुस्तके.
When All is Not Well हे मी वाचलेले त्यांचे पहिलेच पुस्तक. प्रस्तुत पुस्तक हे नैराश्य आणि त्यावर मात करण्याचा योगिक दृष्टीकोण यावर आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ओम स्वामी आपल्याला त्यांच्या परिचयाच्या काही नैराश्यग्रस्त व्यक्तींची उदाहरणे देतात. मात्र त्यापूर्वी ते नैराश्य म्हणजे नेमकं काय आणि नैराश्य व सामान्य दु:ख किंवा अपेक्षाभंग यांतला फरक काय हे स्पष्ट करतात आणि त्यानंतर त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्या काही व्यक्तींच्या नैराश्याची उदाहरणे देतात. या व्यक्तींपैकी काहींच्या नैराश्याची मुळे ही त्या व्यक्तींच्या खडतर व दु:खमय पूर्वायुष्यात होती, पण काही स्वप्नवत सुखी आयुष्य जगलेल्यानाही नैराश्य कसे छळते याचीही उदाहरणे ते आपल्याला देतात. त्यानंतर ते सौम्य नैराश्य, तीव्र नैराश्य व सामान्य उदासीनता यातील फरक स्पष्ट करतात. यानंतर नैराश्याच्या स्थितीत मेंदूत होणारे रासायनिक बदल व त्यावर दिली जाणारी औषधे यांबद्दल अत्यंत महत्वपूर्ण व शास्त्रीय माहिती देऊन ही औषधे अनेकदा आवश्यक असली तरीही केवळ त्यांच्याच मदतीने नैराश्यावर पूर्ण मात करणे कसे शक्य नाही आणि यासाठी सर्वंकष (holistic) उपाययोजना कशी आवश्यक आहे हेही ते पटवून देतात. यामध्ये जीवनशैलीतील बदल, युक्त आहार-विहार, व्यायाम, वाचन, सकारात्मक दृष्टीकोनाची जोपासना तसेच विविध योगिक उपाय यांची सविस्तर माहिती ते शेवटच्या काही प्रकरणात देतात.
अन्न हे acidic (आम्लीय) व alkaline (क्षारीय) अशा दोन मुख्य प्रकारचे असते. त्यातही आम्लीय पदार्थ खाल्ल्याने नैराश्य येण्यास अथवा वाढण्यास मदत होते तर क्षारीय पदार्थ खाल्ल्याने नैराश्यावर लवकर मात करता येते असेही मत ओम स्वामी सप्रमाण मांडतात. मेंदूतील संदेशवहन कार्यक्षम रीतीने होण्यासाठी उपयुक्त असलेली रसायने – म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर्स (उदा. सिरोटोनिन, डोपामाईन, इत्यादी) यांचे योग्य संतुलन राहण्यासाठी कोणता आहार योग्य आहे याचेही उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रकार तसेच नैराश्यावर मात करण्यासाठी त्यांचे महत्व व उपयुक्तता यांचेही सविस्तर विवेचन लेखकाने केले आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पदोपदी (साधारणत: प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला) प्रेरक कथांच्या द्वारे आपला जीवनविषयक दृष्टीकोण स्वच्छ व नितळ करण्याचा प्रयत्न केला आहे. या कथा वाचून आपण अंतर्मुख होतो व आपल्याला दिशा मिळते.
नैराश्याचा बाबतीतली सर्वात घातक गोष्ट म्हणजे नैराश्याचे अचूक निदान लवकर होतच नाही. नैराश्यग्रस्त व्यक्ती किंवा त्याचे आप्त नैराश्याची लक्षणे लवकर ओळखू शकतच नाहीत. अनेकदा आपल्या डॉक्टरांनासुद्धा नैराश्याचे निदान करण्यात अपयश येते. मात्र प्रस्तुत पुस्तकात लेखकाने नैराश्याला ओळखण्याची स्पष्ट व शास्त्रीय लक्षणे दिली आहेत. एवढेच नव्हे तर सामान्य दु:ख किंवा उदासीनता व नैराश्य यातील फरक कसा ओळखावा ते सुद्धा स्पष्ट करून सांगितले आहे. नैराश्य किंवा विषाद ही मनाची तामसिक अवस्था असून हा आजार सनातन आहे. मात्र आजच्या निसर्गविपरीत, अतिमहत्त्वाकांक्षी व भोगलोलूप जीवनशैलीमुळे तो आज एखाद्या महामारी प्रमाणे बळावला आहे. अतिमहत्त्वाकांक्षा, त्यापाठोपाठ येणारे भय व अपयश, यातून शेवटी उरतो तो भयंकर विषाद. यावर उपाय एकच-अधिकाधिक साधे, निसर्गानुकूल व सश्रद्ध आयुष्य जगणे. नेमकी हीच गोष्ट ओम स्वामी नावाच्या या तेजस्वी, तरुण संन्याशाने आपल्या या १८८ पानांच्या साध्या, सोप्या व सुंदर इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकातून सांगितली आहे. नवे काही शोधू पाहणाऱ्यांना या पुस्तकात फारसे काही सापडणार नाही कदाचित. पण नैराश्यावर मात करण्याचा मार्ग एकच आहे, तो प्राचीन व सनातन आहे, आणि त्याचेच पुनःपुन्हा उच्चारण व आचरण करणेच इष्ट आहे हे निश्चित.
ओम स्वामीं बद्दल, त्यांच्या विचारांबद्दल व त्यांच्या पुस्तकांबद्दल www.omswami.com या त्यांच्या संकेतस्थळावरूनही जाणून घेता येईल.
When All is Not Well: Depression, Sadness and Healing: A Yogic Perspective
Om Swami. HarperCollins India. Rs. 299/- ISBN: 9789351777267
इंग्रजीतले आणखी एक सेल्फ हेल्प बुक तर नाही ना ?