[विचारवेध, पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला माझा निबंध].
भगवान दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले होते. चराचर सृष्टीतील आणि अनेक प्राणीमात्रांना त्यांनी गुरुस्थान दिले, कारण त्यातल्या प्रत्येकापासून दत्तात्रेयांना कुठलातरी बोध झाला किंवा ज्ञान मिळाले. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गूगल हा जगद्गुरु बनला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लहानपणी आपल्या सर्वांना हवे ते दाखवणाऱ्या व हवी ती माहिती देणाऱ्या जादूच्या आरशाची गोष्ट सांगितली जायची. गूगलच्या रुपाने हा जादूचा आरसा प्रत्यक्षात अवतरला आहे असेच म्हणायला हवे. आज गूगलने आपल्या सर्वांच्या आयुष्यात या ना त्या कारणाने, या ना त्या प्रकारे प्रवेश केला आहे. अँड्रॉइड फोन्स मुळे तर गूगल सर्वव्यापी झाला आहे. सर्जेई ब्रिन व लॅरी पेज या दोन तरुणांनी २७ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल या सर्च इंजिनची सुरुवात केली. ‘गूगोल’ या शब्दाशी जवळीक दाखविणारा ‘गूगल’ हा शब्द त्यांनी निवडला, कारण गूगोल या संज्ञेचा अर्थ दहाचा शंभरावा घातांक (१०१००) असा होतो. सुरुवातीला केवळ सर्च इंजिन असलेल्या गूगलने आपल्या दोन दशकांच्या वाटचालीत आता ईमेल, क्लाऊड कम्प्युटिंग, मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम, यासारख्या असंख्य विस्तृत सेवांच्या महाकाय जालाचे स्वरूप धारण केले आहे. आजच्या गूगलला तर ‘स्थिरचर व्यापून दशांगुळे उरणाऱ्या’ जगदात्म्याचीच उपमा शोभेल.
मी गूगलचा वापर नेमका कधीपासून करायला लागलो ते आता नीट आठवत नाही. पण साधारणत:१९९७ पासून- म्हणजे माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी- आमच्या शहरात इंटरनेट सुरू झाले. त्यानंतर एका वर्षाने गुगलचा जन्म झाला. पण मला आठवते की त्या वेळी ‘याहू’ अधिक प्रचलित होते. तांत्रिक दृष्ट्या पाहू गेल्यास याहू हे काही सर्च इंजिन नव्हते. ती एक वेब डिरेक्टरी होती. मात्र गूगलने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (artificial intelligence) अत्यंत अकृत्रिम व प्रभावी वापर करून इंटरनेटवरील माहितीचे अपार भांडार आपल्या कवेत घेतले आणि मग मागे वळून पाहिलेच नाही. गूगलवर शोध घेतल्यानेही मिळत नाही अशी माहितीच नाही, असेच समीकरण रूढ होऊन बसले.
जे महाभारती नाही | ते नोहेचि लोकी तिही |
येणे कारणे म्हणिपे पाही | व्यासोच्छिष्ट जगत्रय ||
ही माऊलींची ओवी महाभारतासारखीच आजच्या गूगललाही अगदी चपखलपणे लागू होते. मात्र मी गूगलला गुरू मानले त्याची काही विशिष्ट कारणे आहेत. अर्थात, त्यात वैयक्तिक आवड व व्यावसायिक निकड या दोन्हींची मोठी भूमिका आहे. इंग्रजी साहित्यात एम. ए. करताना अनेकदा आमच्या छोट्या शहरात काही पुस्तके किंवा साहित्यकृती उपलब्ध नसत. अशावेळी गूगलचा आधार घ्यायचो आणि मग सहज काम व्हायचे. एवढेच नव्हे, तर संबंधित माहितीचा खजिनाच हाती लागायचा. ही गोष्ट आहे २००० सालातली. अगदी पहिल्यांदा गूगलवर सर्च करून टी. एस. ईलियटचा Tradition and Individual Talent हा निबंध मिळवला तेव्हां कोण आनंद झाला होता. तिथून गूगलने मनात घर केले ते कायमचेच. हळूहळू गूगलमुळे ऑनलाइन बुक स्टोअर्सची ओळख झाली. आतापर्यंत दुर्लभ वाटणारी मोठी मोठी प्रसिद्ध व विद्वत्ताप्रचुर पुस्तके घरबसल्या उपलब्ध व्हायला लागली आणि मुळातच असलेले ग्रंथप्रेम शतपटीने वाढले. पॉकेटमनीतून बचत करत करत ग्रंथसंग्रह करायला लागलो. पुढे यथावकाश इंग्रजीच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि तेव्हापासून आजतागायत उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा पुस्तकांवर खर्च होऊ लागला. ही सर्व गूगल गुरुची कृपा. गुगलमुळेच टाईम्स लिटररी सप्लीमेंट चा परिचय झाला, त्याची भेट प्रत मिळाली आणि अजूनही या श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यिक नियतकालिकाचा लाभ व आस्वाद मी घेतो आहे.
२००५ पासून तर गूगलने ज्ञानाच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांतीच घडवून आणली. ज्ञान हे मुक्त असावे व सर्वांना सदैव उपलब्ध असावे या उद्देशाने गूगलने गूगल बुक्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. याद्वारे गूगलने जगभरातील मोठमोठ्या विद्यापीठांच्या व संस्थांच्या ग्रंथालयांशी संपर्क करून व त्यांच्या संग्रहातील मौल्यवान पुस्तकांचे व नियतकालिकांचे संगणकीकरण करून ही पुस्तके गूगल बुक्स च्या माध्यमातून सर्वांना मोफत उपलब्ध करून दिली आहेत. यातील ज्या पुस्तकांवरचे स्वामित्वहक्क संपुष्टात आले आहेत, अशी पुस्तके पूर्णतः मोफत वाचता अथवा डाऊनलोड करता येतात, तर इतर पुस्तकांचे ओझरते वाचन करता येते. गूगल बुक्स मधून असंख्य दुर्मिळ पुस्तके मला मिळवता आली. त्यात अतिशय दुर्मिळ अशा अनेक जुन्या इतिहासग्रंथांचाही समावेश आहे. हे शेकडो ग्रंथ केवळ ओझरते पाहिले तरी आनंदाचे भरते येते. आपल्याजवळ ही पुस्तके आहेत या सुखद जाणिवेने जो अत्यानंद होतो त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.
गूगलने आमच्यासारख्या शिक्षकांवर तर अनेक उपकार करून ठेवले आहेत. जगभरातील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी गूगलसारखा सखा दुसरा नाही. अगदी अलीकडे गूगलने शिक्षणक्षेत्रासाठी उपलब्ध करून दिलेली एक प्रभावी प्रणाली म्हणजे ‘गूगल क्लासरूम’. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी आज उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांपैकी सर्वात प्रभावी व सोपे असे हे माध्यम आहे. या गूगल क्लासरूम मुळे सर्वकाळी व सर्व स्थळी विद्यार्थी व शिक्षक दोन्ही विनासायास अध्ययन-अध्यापन करू शकतात. अशीच महती गूगलच्या यूट्युब या सुप्रसिद्ध सेवेची आहे. यूट्युब नसते तर आज जगभरातील अनेक थोरामोठ्यांच्या चित्रफिती, विद्वानांची व्याख्याने, दुर्मिळ माहितीपट व मुलाखती यांसारखी अनेक अमूल्य रत्नभांडारे काळाच्या उदरात लुप्त झाली असती. संशोधक व प्राध्यापकांसाठी आपल्या संशोधनाची शिस्तबद्ध सूची ठेवण्यासाठी, संदर्भ शोधण्यासाठी तसेच अवतरणे आदींची संख्या मोजण्यासाठी गुगलनेच सर्वप्रथम गूगल स्कॉलर ही सुविधा सुरू केली.
आता तर गूगलने ज्ञानाचे कोणतेही क्षेत्र अस्पर्शित ठेवले नाही. ईमेल (Gmail), कॅलेंडर (Google Calendar), व्हिडीओ ऑन डिमांड (YouTube), ब्लॉगिंग (Blogger), क्लाऊड कम्प्युटिंग (Google Drive), संशोधन(Google Scholar), भाषांतर (Google Translation), मौखिक आज्ञावली (Google Talk), शब्दांकन (Google Speech to Text) , वेबसाईट निर्मिती (Google Sites), ऑनलाईन शिक्षण प्रणाली (Google Classroom), शैक्षणिक व व्यावसायिक कामांसाठी प्रश्नावली (Google Forms), मोबाईल व टॅबलेट पीसी करिता अँड्रॉइड प्रणाली अशा असंख्य सुविधांमार्फत गूगलने मानवी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला व्यापले आहे. सर्च इंजिन म्हणून तर गूगलला नाव घेण्यासारखा एकही प्रतिस्पर्धी आज उरलेला नाही. इंटरनेटवर माहिती शोधणे याला ‘गूगल करणे’ असा समानार्थी शब्दच आता रूढ झाला आहे. क्रियापद म्हणूनही आता इंग्रजीत गूगल हे क्रियापद सर्वमान्य झाले आहे. दिवसेंदिवस गूगल स्वतःला अधिकाधिक स्मार्ट बनवतो आहे. आता तर चालक रहित वाहनेही गूगलने आणली आहेत. गूगल अर्थ, गूगल मॅप्स यांच्या माध्यमातून गुगलच आता आपला सारथी, वाटाड्या, मार्गदर्शक आदी सर्वकाही झाला आहे. ‘एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा चमत्कार म्हणजे गूगल’ असे जर उद्या इतिहासात नमूद झाले तर मुळीच आश्चर्य वाटायला नको इतकी प्रचंड प्रगती गूगलने केली आहे. मात्र गूगलला गुरुस्थानी मानततांना शिष्य म्हणून आपणही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे- नव्हे, अनिवार्य आहे.
आपण आपल्या बुद्धीचा वापर कमीत कमी करून गूगलच्या ओंजळीने पाणी प्यायला लागलो आहोत का? आपल्या ज्ञानात भर टाकण्याची सर्व जबाबदारी गूगलगुरुवर टाकून इतर ज्ञानस्त्रोतांना आपण हद्दपार करत आहोत का? या व अशा प्रश्नांवर चिंतन होणे अत्यंत आवश्यक आहे.
गूगलने माणसाला नव्हे तर माणसाने गूगलला निर्माण केले आहे. शेवटी मानवी बुद्धीचे सामर्थ्य श्रेष्ठ आहेच. गूगलसारख्या सुविधा मित्र म्हणून हात देण्यासाठी आहेत. त्या तात्पुरत्या मदतीसाठी आहेत. आपल्याला प्रज्ञावंत होण्यास मदत करण्यासाठी आहेत. आपल्याला दुर्बल, परावलंबी व पंगू बनवण्यासाठी नाहीत, हे आपण विसरता कामा नये. गूगल नसतानासुद्धा उपलब्ध ज्ञानस्त्रोतांच्या मदतीने अथक परिश्रम करून थक्क करून सोडणारे शोध शास्त्रज्ञांनी लावले आहेत, मूलगामी व मौलिक विचार देणारे ग्रंथ प्रज्ञावंतांनी लिहिले आहेत आणि स्तिमित करणारे विद्वत्तेच्या क्षेत्रातले मोठमोठे प्रकल्प कधी अनेकांनी मिळून तर कधी एकांड्या शिलेदारांनी तडीस नेले आहेत. म. म. पां. वा. काणे यांनी पाच खंडात लिहिलेला धर्मशास्त्रांचा इतिहास असो की भांडारकर संस्थेच्या विद्वानांनी ४९ वर्षे अथक परिश्रम करून सिद्ध केलेली महाभारताची चिकित्सक आवृती असो, असे महाकाय प्रकल्प कुठल्याही गूगलच्या, संगणकाच्या किंवा इंटरनेटच्या मदतीशिवायच पार पडले आहेत. आज या दर्जाचे किती संशोधन होताना दिसते? म्हणूनच कधी कधी प्रश्न पडतो की ज्याला आपण मौलिकता म्हणतो ती गूगलच्या आगमनानंतर हरवत चालली आहे काय? कॉपी-पेस्ट विद्वत्ता, वाङ्मयचौर्य वाढीला लागले आहे. एकाग्रता नाहीशी होते आहे. नेमकी हीच खंत अटलांटिक मासिकात २००८ साली लिहिलेल्या ‘ईज गूगल मेकिंग अस स्टुपिड?’ या लेखात निकोलस कार या लेखकाने बोलून दाखविली आहे. गूगल म्हणजेच सगळे इंटरनेट असे नाही, पण इंटरनेटचे जे बरे-वाईट परिणाम आपल्यावर होतात त्यात गूगलचा वाटा सिंहाचा आहे हेही खरे.
एकूण काय, तर गूगल आपला गुरू आहे हे तर खरेच. पण खऱ्या गुरुप्रमाणे अज्ञानतिमिराच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी त्याने द्यावी की फ्रँकेन्स्टीनसारखा भस्मासूर होऊन आपल्या मानगुटीवर बसावे, हे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.
शेवटी एका स्वरचित श्लोकाने गूगलगुरुची महती सांगून पुरे करतो-
तंत्रज्ञानकुंजिकया येन ज्ञानद्वारोद्घाटितम् |
ज्ञानरत्नाकरम् तं गूगलगुरुम् नमाम्यहम् ||
(तंत्रज्ञानाच्या किल्लीने ज्याने ज्ञानाचे दार उघडले त्या ज्ञानसागर गूगलगुरूला मी नमस्कार करतो. )
————————–
अप्रतिम, दर्जेदार निबंध.
खुप खुप अभिनंदन प्रथम पारितोषिक प्राप्त झाल्या बद्दल.
Great Thakur sir, really you possess all the qualities of an essayist.
Congratulations Sir
Lots of time I read a eassy
Nice writing