‘हिंदू’ ची दशकपूर्ती …

hindu_novel‘हिंदू’ ही नेमाड्यांची magnum opus आहे, हे निश्चित. ‘कोसला’ पासून चालत आलेला त्यांच्या लेखनाचा प्रवाह ‘हिंदू’ मध्ये विशाल रूप धारण करतो. या कादंबरीच्या प्रकाशनाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ ने नुकतीच एक चर्चा घडवून आणली. त्यात अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली.

मुळात नेमाड्यांच्या या कादंबरीकडून वाचकांच्या अपेक्षाच फार होत्या / आहेत असे आजही या चर्चेतून स्पष्ट होते. हेच या कादंबरीचे यश म्हणता येईल. ‘हिंदू’ हा शब्दच मुळात भारतीयांसाठी आणि भारताच्या अभ्यासकांसाठी अत्यंत संवेदनशील. त्यात या कादंबरीचे शीर्षक अत्यंत तिरपागडे- ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’.  आता या शीर्षकातला ‘हिंदू’  शब्द नेमके काय सुचवतो ? हिंदू धर्म ? की हिंदू संस्कृती ? हिंदू समाज की हिंदुत्व ही राजकीय विचारधारा ? की एकंदरीत सर्वच ? यापैकी नेमके कशाला ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हटले आहे ?

मला वाटते या शीर्षकातील ‘हिंदू’ या शब्दावरून नेमाड्यांना ‘हिंदू’ ही  आयडेंटिटी, ही ओळख, अपेक्षित आहे. ही ओळख एका विशिष्ट सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेतून तयार होते. नेमाडे तिलाच ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ म्हणतात.

ही अडगळ आहे म्हणजे सुरुवातीपासूनच आहे की आता अडगळ झाली ? पुन्हा ही अडगळ समृद्धही आहे कारण ती खूप अनादिकालापासून विकसित होत, घडत घडत, जुळत, तुटत, सांधत तयार झालेली आहे. या कादंबरीतून नेमाडे नेमके काय सांगू पाहतात? मला वाटते ‘हिंदू’ म्हणून जी काही एक ओळख आहे, ती एक फार फार मोठी, फार वैविध्यपूर्ण सांस्कृतिक संकल्पना आहे आणि सर्व स्थिरचर व्यापून पुन्हा दशांगुळे उरणाऱ्या हिंदू देवतेसारखीच सर्वांना सामावून पुन्हा वेगळी राहणारी आहे हे नेमाड्यांना अधोरेखित करायचे आहे. हे काम ते त्यांच्या खास ‘नेमाडे  स्टाइल’ ने करतात. ‘हिंदू’ मधला नायक खंडेराव हाही त्यांच्या इतर नायकांसारखाच तरुण आहे, संघर्ष करतो आहे, तो अस्वस्थ व गोंधळलेलाही आहे. तो पुरातत्वसंशोधक आहे. आर्कीयोलोजी मध्ये पीएच. डी. करतो आहे. पुरातत्वसंशोधक केल्याने नेमाडे त्याच्याकडून संस्कृतीची गोष्ट सहज वदवून घेऊ शकले आहेत. खानदेशातील मोरगाव या आपल्या छोट्याश्या गावापासून फार फार लांब आताच्या पाकिस्तानातील मोहेंजोदडो च्या उत्खननस्थळी तो काम करतो आहे आणि तिथेच त्याला वडील अत्यवस्थ असल्याची तार मिळते. मग तिथून ते थेट घरापर्यंतच्या प्रवासात तो आपली हजारो  वर्षांपासूनची  विशाल संस्कृती आणि तिच्या परिप्रेक्ष्यात आपण स्वत:, आपले कुटुंब, आणि आपला गाव यांच्याबद्दल त्यांच्यातल्या परस्परसंबंधांबद्दल चिंतन करतो. भूतकाळाचा प्रचंड प्रवाह त्याच्या डोळ्यांपुढून सरकत जातो. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर आता तेही त्याच विशाल भूतकाळाचा एक अभिन्न भाग झाले आहेत अशा विचारांमध्ये तो असतांनाच कादंबरी संपते.

नेमाड्यांच्या कादंब-यांचे कथानक सामान्यपणे कालक्रमानुसार सांगितलेल्या गोष्टीच्या धाटणीतले नसते. एक पट मांडलेला असतो आणि त्या पटाच्या मर्यादेत नायकाच्या आयुष्याचा घटनाक्रम त्याच्या त्या संपूर्ण व्यवस्थेवरच्या किंवा एकूणच जगण्यावरच्या भाष्यासह स्वैर संचार करत असतो.  पण हे सर्व एका आखीव मर्यादेतच होते.  खंडेरावचेही तसेच झाले आहे. अफगाणीस्थानापासून  ते खानदेशातील त्याच्या मोरगावापर्यन्तचा – सिंधू ते तापी आणि पुढचा- असा अजस्त्र आणि विविधतांनी व  विरोधाभासांनी भरलेला आणि तरीही एकाच सांस्कृतिक वस्त्रात विणलेला उपखंड आणि त्या उपखंडामधील मानवी इतिहासातील अभूतपूर्व अशी सतत सुरु राहिलेली उलथापालथ यावर संपूर्ण कादंबरीभर खंडेराव चिंतन करीत असतो. मी कोण? कुठून आलो? का आलो? हे सनातन प्रश्न त्याला अस्वस्थ करत असतात. पुरातत्वसंशोधनाचे त्याचे काम त्याला सतत अद्भुतरम्य आणि अनादि अशा भूतकाळात सतत ओढत राहते. या पार्श्वभूमीवर तो आपले गाव,आपले कुटुंब आठवत राहतो. आपल्या डोळ्यांसमोर उलगडत जाणा-या विशाल सांस्कृतिक पटाचेच प्रतिबिंब त्याला आपल्या गावगाड्यातही दिसते.  ‘या’ काय किंवा ‘त्या’ काय – सगळ्या मानवसमूहाच्या जगण्याच्या आदिम प्रेरणा सारख्याच. जगण्यासाठीचा झगडाही सारखाच. अगदी सिंधू संस्कृतीपासून चालत आलेला हा जीवनप्रवाह एकाच वेळी किती वैचित्र्यपूर्ण आणि तरीही किती सातत्यपूर्ण ! या सातत्याचेच गूढ खंडेराव उकलू पाहतो आहे. अनेकांनी आपापल्या परीने व आपल्याला जमेल, रुचेल त्या माध्यमांतून हे गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळी आहेत- म्हटलं तर सगळीच बरोबर , म्हटली तर सगळीच चूक.

खंडेरावची शोधयात्रा आतापर्यंत रंगतदार राहिली आहे. ‘हिंदू’ च्या पुढच्या भागांमध्ये ती कशी असेल, हेच आता बघायचे.

One thought on “‘हिंदू’ ची दशकपूर्ती …

Leave a reply to panfade Cancel reply